परभणी - दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून बँक परस्पर थकबाकीची रक्कम व्याजासह कपात करत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. पीक कर्जातून थकबाकी वसुलीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज (शुक्रवार) मानवत येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर मोर्चा काढला.
यावेळी शेतकऱ्यांनी कपात केलेली रक्कम बँकेने तत्काळ परत करावी, ही मागणी लावून धरली होती. बसस्थानक परिसरातील महाराणा प्रताप या चौकातून मोर्चास सुरुवात करण्यात आली होती. यावेळी बँकेचे व्यवस्थापक मनीष कालरा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, भास्कर खटिंग, राजू शिंदे, केशव आरमाळ, तालुकाध्यक्ष बालासाहेब आळणे, हनुमान मसलकर, माऊली निर्वळ, विक्रम निर्वळ, सुनील पान्हेरे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.