परभणी : राज्यातील अन्य जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येण्यासाठीच्या ई-पासला जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यापूर्वी 31 जुलैपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे जिल्हाधिकार्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय कायम ठेवत परजिल्ह्यातून परभणीत येणाऱ्या नागरिक व वाहनांवर 15 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यानुसार राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी परभणीत येण्यासाठीच्या ई-पास देऊ नयेत, अशा सूचनादेखील केल्या आहेत. मात्र केवळ तातडीच्या वैद्यकीय कामांसाठी परवानगी द्यावी, असेही म्हटले आहे.
परभणी जिल्ह्यात महिनाभरापासून प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे 'लॉकडाऊन'चा सुरुवातीचा दीड महिना ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या परभणीत जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत केवळ 100 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि महाराष्ट्रातील अन्य रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचा लोंढा सुरू झाला. परिणामी, जुलै महिन्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढून तो साडेचारशेवर जाऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर बंदी आणण्यासाठीच्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.
यापूर्वी जिल्ह्याच्या सीमांवर शासकीय कर्मचार्यांचे पथक तैनात करून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. आवश्यक त्यांना क्वारंटाईन केल्या जात आहे. ज्यांच्याकडे परवानगी नाही, त्यांना जिल्ह्याच्या सीमेवरुनच परत पाठविण्यात येत आहे. मात्र, एवढ्या उपायोजना करूनसुद्धा अनेक नागरिक विविध चोरट्या मार्गांनी परभणी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेपासून 31 तारखेपर्यंत परभणी जिल्ह्यात जवळपास साडेपाचशे कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यातील सुमारे 31 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्ह्यात आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासाठी आता जिल्हा प्रशासनाकडून आणखीन उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यापूर्वी 21 जुलैरोजी ई-पास संदर्भात आदेश काढले आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी व आयुक्त यांना पत्र पाठवून परभणी जिल्ह्यात येण्यासाठी नागरिकांना ईपास देऊ नयेत, अशा सूचना केल्या. अर्थात यामध्ये त्यांनी अत्यंत तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी येणाऱ्यांना सूट दिली आहे. तसेच मालवाहतुकीलासुद्धा सूट राहील, असेही म्हटले आहे.
ही स्थगिती त्यांनी 31 जुलैपर्यंत दिली होती. मात्र, 31 जुलैपर्यंत परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही. उलट त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना रोखून जिल्ह्यात येणारा संसर्ग थांबविण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर या माध्यमातून करत आहेत. त्यासाठी या निर्णयात 15 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवत, परभणीत येणाऱ्यांना 15 ऑगस्टपर्यंत ई-पास देऊ नये, अशा सूचना केल्या आहेत. मात्र, या कालावधीत जिल्ह्यात तातडीच्या वैद्यकीय कामांसाठी तसेच मालवाहतुकीसाठी येणाऱ्या लोकांनाच प्रवेश मिळेल. तसेच वैद्यकीय कारणास्तव येणाऱ्यांच्या तातडीची खात्री झाल्यावरच त्यांना परवानगी द्यावी, असे स्पष्ट केले आहे.