परभणी- जिल्ह्यात बुधवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री सुरू झालेल्या पावसाने जिल्हा रुग्णालयात पाण्याची गळती सुरू झाली. मध्यरात्री पासून पहाटेपर्यंत झालेल्या पावसामुळे रुग्णालयातील औषधे ठेवण्यात आलेल्या खोलीच्या छतातून पाणी गळाल्याने औषधांची मोठी नासाडी झाली आहे. कोरोना सारख्या महामारीत औषधांची सुरक्षितता महत्त्वाची असताना नेमकं त्याकडेच दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचले तसेच अनेक ठिकाणी झोपड्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. अशा परिस्थितीत शासकीय इमारती तरी निदान सुरक्षित असाव्यात, अशी अपेक्षा आहे. मात्र, जिल्हा रुग्णालय सारखी महत्त्वाची इमारत सुध्दा पावसाळ्यात सुरक्षित नसल्याने प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुढे आला आहे.
परभणीच्या जिल्हा रुग्णालयात मुख्य ओपीडी जवळ असलेल्या औषध भांडाराच्या खोलीला रात्रीच्या पावसात मोठ्या प्रमाणात गळती लागली. या खोलीचे छत गळके असल्याने पावसाचे पाणी थेट औषधांवर पडले. यात औषध असलेले बॉक्स भिजल्याने औषधांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. रात्रभर पडलेल्या पावसात मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा खराब झाला असून, ही औषधे आता वापरात येतील की नाही ? हा प्रश्न आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात ओपीडीसाठी काही दिवसांपूर्वीच नवीन जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य इमारतीच्या मागील बाजूला ही इमारत आहे. मात्र, त्याच्या बांधणीकडे दुर्लक्ष झाल्याचे यातून पुढे आले आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांना दूरध्वनीवरुन माहिती विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्क झाला नाही. तर अतिरिक्त शल्यचिकित्सक प्रकाश डाके यांनी फोन उचलला नाही. तसेच कर्मचाऱ्यांनी भिजलेला औषधांचा साठा एकत्र करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सकाळी उशिरापर्यंत या नुकसानीची पाहणी कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेली नव्हती.
दुपारनंतर काही अधिकारी येऊन पाहतील, अशी माहिती कर्मचारी देत होते. एकूणच पावसामुळे मोठ्या प्रमाणात औषधांची नासाडी झाली असून, कोरोनासारख्या महामारीत निदान औषधांचा साठा तरी जिल्हा रुग्णालयाने सुरक्षित ठेवायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, नेमके त्याकडेच दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.