परभणी : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी आज (मंगळवारी) सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला थेट भेट देवून कोरोनाबाधित रुग्णांबरोबर हितगूज केले. यावेळी आयुक्तांच्या कानावर आलेल्या भोंगळ बाबींवरून त्यांनी रुग्णालयात प्रशासनाचा चांगलाच समाचार घेतला.
दरम्यान, आयुक्त केंद्रेकरांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारावर सडकून टिका केली. विशेषतः जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांची कठोर शब्दांत खरडपट्टी काढली. जिल्हा रुग्णालयातंर्गत कोविड सेंटरमधील बाधित रुग्णांच्या तपासणीसह औषधोपचारातील दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. 'आपण स्वतः फिजिशियन आहात, परंतू कोविड सेंटरला भेटसुध्दा देत नाहीत. बाधित रुग्णांची तपासणी तर दूर हितगुजसुध्दा करत नाहीत. असे खडेबोल सुनावून, 'आपण जबाबदार अधिकारी आहात, आपत्तीच्या काळात संयमाने वागा, जबाबदारीचे भान राखा, असे खडसावले. तसेच कोविड सेंटरअंतर्गत वैद्यकीय सुविधांचा अभाव, बाधित व्यक्ती आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील असमन्वय या बाबींवरदेखील आयुक्तांनी कडवट प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कोरोना सेंटरमधील अवस्थेबद्दल अनेक किस्से समोर आले आहेत, असे नमुद करत आता सावध व्हा. कामात तत्परता दाखवा, जबाबदारीने वागा अन्यथा आपल्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा निर्वाणीचा इशारा देखील आयुक्त केंद्रेकर यांनी दिला. शिवाय जिल्हा रुग्णालयावर आपले नियंत्रण नाही. यंत्रणांमध्ये समन्वयक नाही, अन्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना आपण कामास लावू शकला नाहीत. या हलगर्जीपणामुळे स्थिती दिवसेदिवस गंभीर होत आहे, असेही केंद्रेकरांनी नमुद केले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी व जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी उपस्थित होते.