परभणी - गंगाखेड येथील संत जनाबाई व संत मोतीराम महाराज यांच्या 'हेलिकॉप्टरवारी'ची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही संतांची वारी यंदा रद्द झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त व सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारची परवानगी देऊ नये, असे कळविल्यानंतर परभणीच्या जिल्हा प्रशासनाने देखील या 'हेलिकॉप्टरवारी'ची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदा सावळ्या विठ्ठलाच्या भेटीला जनाबाईची पालखी आज पंढरपूरला जाऊ शकली नाही. यावर मात्र वारकरी संप्रदायाकडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे.
गेल्या महिनाभरापासून संत जनाबाई आणि संत मोतीराम महाराज यांची आषाढीवारी हेलिकॉप्टरने नेण्याची व्यवस्था सुरू होती. यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण पाहणी करून ठेवली होती. शिवाय गंगाखेडजवळ हेलिपॅडची निर्मिती देखील करण्यात आली होती. मात्र आषाढी एकादशीनिमित्त आज(बुधवारी) पंढरपुरात गर्दी होऊ नये म्हणून बाहेरून कोणीही येणार नाही, यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रचंड खबरदारी घेतली जात आहे. शहरात मानाच्या 9 पालख्यांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश मिळणार नाही, असे शासनाचे स्पष्ट निर्देश होते. त्यामुळे गंगाखेडहून संत जनाबाई व संत मोतीराम महाराज यांची पंढरीची वारी अखेर रद्द करावी लागली. मात्र, या निर्णयामुळे वारकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पालखी वारीचा हा पेच उद्भवल्यानंतर ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर, मनोहर महाराज केंद्रे, संयोजक गोविंद यादव यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेतली होती. जर हेलिकॉप्टरद्वारे परवानगी मिळत नसेल तर केवळ पाच जणांसाठी खाजगी वाहनाद्वारे पादुका नेण्याची परवानगी मिळावी, कोणत्याही परिस्थितीत ही परंपरा खंडित होऊ नये, अशी मागणी या सर्वांनी जिल्हाधिकार्यांकडे केली. त्यानुसार परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे आयुक्त यांच्याशी संपर्क साधला, मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे पुणे विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वारीची परवानगी नाकारली. परिणामी यंदा संत जनाबाई विठ्ठलाच्या भेटीसाठी येऊ शकल्या नाहीत.
पुणे विभागीय आयुक्त, सोलापूर जिल्हाधिकारी यांनी बाहेरून येणाऱ्या कोणालाही परवानगी दिली जाऊ नये, अशी भूमिका घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेनंतर सर्व पर्यायच खुंटले. मात्र शेवटचा पर्याय म्हणून आम्ही राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संयोजकांनी परवानगीसाठी प्रयत्न सुरूच ठेवले होते. मात्र, अखेर त्यांच्या पदरी निराशाच पडली.
पुणे-सोलापूर प्रशासनाचा निर्णय निषेधार्ह-
गंगाखेडच्या संत जनाबाई आणि मोतीराम महाराज यांच्या वारीची अनेक वर्षांची वारीची परंपरा आहे. ती यावर्षी खंडित होऊ नये, म्हणून आम्ही स्व:खर्चाने, शासनाला कुठलाही भार न देता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून 'कोरोना'चे सर्व नियम पाळत पंढरपूरला रवाना करणार होतो. मात्र पुणे आणि सोलापूरच्या प्रशासनाने आडमुठी भूमिका घेऊन परवानगी न दिल्याने परभणीच्या जिल्हा प्रशासनाने देखील आमची वारी रद्द करण्याचे सुचवले. यासंदर्भात पुणे-सोलापुर प्रशासनाचा निर्णय निषेधार्हच आहे, अशी भावना देखील गोविंद यादव यांनी व्यक्त केली.