परभणी - भाजपची महाजनादेश यात्रा आज गुरुवारी परभणी दौऱ्यावर आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भाषणा दरम्यान उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केल्याने सभेत चांगलाच गोंधळ उडाला.
जिल्ह्यातील सेलू येथे मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान पोहचली. या सभेला भाजपचे अनेक वरिष्ठ नेते हजर असून या सभेसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. दरम्यान, पिकविम्याचं बोला, कर्जमाफीचं बोला, म्हणत उपस्थितांनी घोषणा दिल्याने सभेत चांगलाच गोंधळ उडाला.
गोंधळावर मुख्यमंत्र्यांची सारवासारव -
सभेदरम्यान, उपस्थितांनी मुख्यमंत्रीसाहेब पीक विम्याचं बोला, कर्जमाफीचं बोला, अशा घोषणा दिल्याने गोंधळ झाला. यावर फडणवीसांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आमच्या प्रत्येक सभेत असे दोन-चार नमुने पाठवत असतात, त्यांचा हा गोंधळ चॅनलवाले दाखवतात आणि त्यांना प्रसिद्धी मिळते. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण सुरु ठेवले. तसेच त्या तरुणांना बाजूला घ्या, सभेनंतर मी त्यांच्याशी बोलतो, त्यांची बाजू ऐकूण घेतो, असेही ते म्हणाले. यानंतर पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन बाजूला नेल्याची माहिती आहे.