परभणी - पाथरी तालुक्याच्या देवेगाव आणि रेणाखळी या गावांमध्ये अवैध सावकारी प्रकरणी दोन जणांच्या घरांवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने धाड टाकून संपूर्ण घराची झाडाझडती घेतली. यामध्ये पथकाला काही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली असून, या कागदपत्रांच्या पडताळणीचे काम सुरू आहे. या पडताळणीत अवैध सावकारी सिद्ध झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली आहे.
हेही वाचा-खासदार फौजिया खान यांचे आपल्याच पक्षाच्या पालकमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह!
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे या प्रकरणी तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार अवैध सावकारी प्रकरणात ज्यांच्या विरोधात तक्रारी आल्या त्यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी पथक तयार करण्यात आले. या पथकाने पहिला छापा ४ सप्टेंबरला पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील ज्ञानेश्वर आण्णा मगर व तुकाराम आण्णा मगर यांच्या घरावर टाकला. त्यात संपूर्ण घरांची झाडाझडती घेण्यात आली.
आज (बुधवारी) देखील पाथरी तालुक्यातीलच रेणाखळी येथील सुदाम अंबादासराव श्रावणे व मदन सिताराम श्रावणे यांच्या घरावर अचानक छापा टाकण्यात आला.यात घराची झडती घेण्यात आली. यामध्ये पथकाला खरेदीखते व सावकारी संदर्भातील इतर कागदपत्रे आढळुन आले. अवैध सावकारी बाबत सबंधितास त्यांची बाजू सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर अवैध सावकारी सिध्द झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक उमेशचंद्र हुशे, बी.एस.नांदापुरकर, भाऊराव कुरुडे, एम.यु.यादव, पथक प्रमुख पी.बी.राठोड, ए.जी.निकम आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.