परभणी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवर जास्त प्रेम आहे, असे देवेंद्र फडणवीस बिहारमधल्या एका प्रचार सभेत म्हणाले, त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या बाबतीत बोलण्याचा अधिकारच राहिला नाही, असे अल्पसंख्याक मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
भाजप महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय करत आहे. हे जनता उघड्या डोळ्याने पाहत असून, देवेंद्र फडणवीसांनी समजून घ्यावे की आता पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. अर्धी चड्डी घालून एका गावात एक बोलायचे, दुसऱ्या गावात दुसरे. हे आता लोकांना समजतआहे. आता फुल पॅन्ट झाली आहे. त्यामुळे त्यांनी अर्ध्या चड्डीतील सवय सोडावी, असा टोला देखील नवाब मलिक यांनी लगावला.
परभणी जिल्ह्यात परतीचा पाऊस तथा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री नवाब मलिक हे आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आले. दुपारी तीन वाजता त्यांनी या संदर्भात आढावा घेऊन पत्रकारांना माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलीस अधीक्षक जयंत मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., मनपा आयुक्त देविदास पवार आदी उपस्थित होते. तसेच नवाब मलिक यांनी यावेळी सेलू तालुक्यात बाधित शेतांच्या केलेल्या पाहणीची माहिती दिली.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असल्याचे देखील ते म्हणाले. 75 टक्के संसर्ग कमी झाला, ज्यामुळे जिल्ह्यातील ज्या मंगल कार्यालयांमध्ये क्वॉरन्टाइनची व्यवस्था करण्यात आली होती, ती मंगल कार्यालये बंद करण्यात आली आहेत. येणाऱ्या काळात रुग्ण संख्या वाढल्यास तयारी म्हणून जिल्हा रुग्णालय, आयटीआय बिल्डिंग आणि जिल्हा परिषदेची नवीन इमारत या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. थंडीच्या दिवसात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे, म्हणून या सुविधा करण्यात आल्याचे ते म्हणाले. मात्र, ज्या खासगी लोकांनी कोविड हॉस्पिटल उभारले आहेत, ते बंद करू शकतात. परंतु, महात्मा फुले अंतर्गत सुरू असलेले हॉस्पिटल बंद करता येणार नाहीत, हे देखील नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
परभणीतील 1 लाख 58 हजार हेक्टर जमीन बाधित; 108 कोटीच्या मदतीची अपेक्षा
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जवळपास 2 लाख 15 हजार 675 शेतकऱ्यांची 1 लाख 58 हजार 386.51 हेक्टर जमीन बाधित झाली आहे. ज्यामुळे परभणी जिल्ह्याला जवळपास 108 कोटी 15 लाख रुपयांची मदत आवश्यक आहे. ही नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून, येणाऱ्या कॅबिनेटमध्ये याबद्दल अंतिम निर्णय होऊन शेतकऱ्यांच्या हातात मदत मिळेल. तसेच हवामान खात्याने 25 तारखेपर्यंत पाऊस सांगितला असून, त्यावर देखील शासनाचे लक्ष आहे. त्या आधारावर शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठीची देखील प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
'...म्हणून अतिवृष्टीच्या पाहणीसाठी झाला उशीर'
नवाब मलिक यांच्यावर जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उशीर केल्याचा आरोप विरोधीपक्षांनी लावला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, 'माझ्या घरात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने मी स्वतः क्वॉरन्टाइन झालो होतो. ज्यामुळे मला येण्यास उशीर झाला आहे; परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील पालकमंत्र्यांपेक्षा माझे परभणी जिल्ह्यातील दौरे जास्त आहेत. फोटोसेशन करून मदत मिळत नाही. प्रशासनाला सक्रिय करावे, लागते असा टोला देखील नवाब मलिक यांनी विरोधकांना लगावला आहे.
'एकनाथ खडसे यांना 'राष्ट्रवादी'त योग्य जबाबदारी दिली जाईल'
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत बोलताना नवाब मलिक यांनी 'कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेऊन एकनाथ खडसे यांना जबाबदारी दिली जाणार नाही', राजकारणात अशा चर्चा होत असतात. मात्र, गॉसिपवर राजकारण होत नाही, असे स्पष्ट केले. उलट एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा मोठा जनाधार असून पक्ष वाढीसाठी ते निश्चितच उपयोगी पडतील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे योग्य निर्णय घेऊन त्यांना जबाबदारी देतील, असे देखील नवाब मलिक यांनी सांगितले.