परभणी - येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह एक अभियंता आणि एका अव्वल कारकूनाला तब्बल साडेचार लाख रुपयांची लाच घेताना आज (मंगळवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अटक केली आहे. या प्रकरणी गंगाखेड नगरपालिकेच्या एका नगरसेवकाने तक्रार केली होती. ज्यामध्ये स्वाती सूर्यवंशी यांनी विकासकामांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दीड टक्क्यांप्रमाणे ही साडेचार लाख रुपयांची लाच मागितल्याचा म्हटले आहे.
विशेष म्हणजे, स्वाती सूर्यवंशी या परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी एकाच रात्रीतून शेकडो विहिरींना मंजुरी देऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. पण, त्यानंतर गेल्या वर्षीच्या त्या परभणीत उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या. मागच्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडे निवासी उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी तसेच इतर काही खात्यांच्या उपजिल्हाधिकारी पदाचा कार्यभार होता.
गंगाखेड नगरपरिषदेतील एका नगरसेवकाने काल (सोमवारी) परभणीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. ज्यामध्ये स्वाती सूर्यवंशी यांनी गंगाखेड येथील विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी एकूण निधीच्या दीड टक्के म्हणजेच साडेचार लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार केली. त्यानुसार कालच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष या प्रकरणाची पडताळणी केली.
त्यानुसार आज (मंगळवारी) परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन विभागात अव्वल कारकून श्रीकांत करभाजन यांच्या कक्षात सापळा लावण्यात आला. याठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी व अव्वल कारकून श्रीकांत करभाजन यांच्या सांगण्यावरून अब्दुल हकीम यांनी ही लाच स्वीकारली. त्यावेळी त्याला रंगेहात पकडण्यात आले. तर या प्रकरणात स्वाती सूर्यवंशी आणि श्रीकांत करभाजन या दोघांनाही तात्काळ अटक करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात बसविण्यात आले आहे. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.