परभणी - तालुक्यातील संबर आणि परिसरातील अनेक गावांमध्ये हरणांचा सुळसुळाट झाला आहे. रानडुक्कर आणि रोही देखील नुकतेच उगवलेले पिके नष्ट करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले असून, भविष्यात देखील काढणीला आलेले पीक या वन्यप्राण्यांकडून नष्ट केल्या जाण्याची भिती आहे. त्यामुळे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. तसेच या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा एखाद्या अभयारण्यामध्ये ते नेऊन सोडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
दुबार, तिबार पेरणी करण्याची वेळ -
गेल्या सहा-सात वर्षांपूर्वी परभणी तालुक्यातील संबर आणि परिसरातील काही गावांमध्ये 3-4 हरण आले होते. आता ते प्रचंड संख्येने वाढले असून, त्यांचा मोठा कळप बनला आहे. हा शेतकऱ्यांसाठी प्रचंड डोकेदुखीचा विषय ठरला आहे. या हरणाच्या त्रासामुळे शेतकरी वैतागले असून, हे हरण नुकतेच उगवलेले लहान रोपे खाऊन टाकत आहेत. त्यामुळे ते पीक मुळासकट नष्ट होत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पेरलेले काहीच हाती येणार नाही. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार तसेच तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील सर्वच गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान -
तसेच सांबरसह सावंगी, मटकऱ्हाळा, साडेगाव आदींसह संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात हरणांसह रानडुकरे आणि वानरांनी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागला आहे. शासनाने तत्काळ उपलब्ध करण्याची मागणी संबर गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - आज कोल्हापुरात सारथीच्या उपकेंद्राचे उद्घाटन, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
हरणांसोबतच रानडुक्कर, रोही प्राण्यांचा सुळसुळाट -
हरणांसोबतच रानडुक्कर आणि रोही प्राण्यांचाही सुळसुळाट झाला आहे. ते शेतीचे अतोनात नुकसान करत आहेत. चार वर्षांपूर्वी देखील वन्य प्राण्यांमुळे शेतीचे असेच मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी वनविभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात चार वर्षात वन विभागाने या प्राण्यांचा कुठलाही बंदोबस्त केला नाही, अशी माहिती शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंतराव पवार यांनी दिली.
हरणांचा तत्काळ बंदोबस्त न झाल्यास आंदोलन -
सध्या वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या नुकसानीचे आता शासनाने पंचनामा करून पेरणीचा खर्च द्यावा. तसेच पीक काढण्यापूर्वी वन्यप्राण्यांकडून पिकाची नासाडी झाल्यास संपूर्ण पिकाची नुकसान भरपाई द्यावी. शिवाय या वन्य प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा किंवा त्या त्या गावातील गावकऱ्यांना हे वन्य प्राणी पकडून एखाद्या अभयारण्यामध्ये नेऊन सोडण्याची परवानगी द्यावी, अन्यथा शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशाराही अनंतराव पवार यांनी दिला आहे.
हेही वाचा - चिंतेची बाब..! राज्यात काही दिवस पावसाचा जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज