परभणी - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात मिळालेल्या स्थगितीमुळे मराठा समाजातील नागरिक आक्रमक होऊ लागले आहेत. जिल्ह्यात आलेल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा ताफा रोखण्यासोबतच मराठा आंदोलकांनी जिल्ह्यातील सर्वच खासदार व आमदारांच्या घरासमोर निदर्शने केली. त्यानंतर आता आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून गावबंदीचा निर्णय आज (रविवारी) परभणीत पार पडलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता आता सरकारविरोधात गनिमी काव्याने देखील लढाई उभारली जाईल, असा निर्धार देखील सकल मराठा समाजाने जाहीर केला आहे. परभणीतील स्टेडियमजवळील हॉटेल अतिथी सभाहगृहात पार पडलेल्या या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक सुभाष जावळे यांनी आंदोलनासंदर्भात पुढील दिशा जाहीर केली. विशेषतः, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर येऊन आंदोलन करणे उचित नाही. सर्व समाज बांधवांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे, या भूमिकेतूनच सकल मराठा समाजाने रस्त्यावर येण्याऐवजी सरकारविरोधात गनिमी काव्यानेच संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे, असे जावळे यांनी सांगितले.
तसेच, आंदोलनाचा पुढचा भाग म्हणूनच खेड्यापाड्यांमध्ये गावबंदीचा निर्णय घेण्यात आला. तर, यापूर्वी केल्याप्रमाणे जिल्ह्यातील खासदार व आमदार यांच्या घरांसमोर प्रखर आंदोलन करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. त्यामुळे, समाज आणखी आक्रमक होण्याआधीच लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारला आरक्षण प्रश्नावर ताळ्यावर आणावे, असे आवाहन जावळे यांनी केले. बैठकीत जिल्ह्यातील मराठा बांधव व समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा- परभणीतील कोरोना उपाययोजनांची इतर जिल्ह्यातही होते अंमलबजावणी - नवाब मलिक