परभणी - जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी बरसलेल्या अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागील आठवड्यात देखील अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचे अद्याप पंचनामे देखील झालेले नसताना आता पुन्हा शेतकरी नैसर्गिक संकटात अडकत असल्याचे चित्र आहे.
सध्या कोरोनाच्या संकटाने सर्व नागरिक त्रस्त असतानाच अवकाळी पावसाचेही संकट ओढवले आहे. मागच्या आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यात मानवत, सेलू, पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ आणि जिंतूर या तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यामुळे आंबा आणि संत्री या फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. तर काढणीला आलेले ज्वारी, गहू अक्षरशः आडवे झाले होते. काढणीला आलेली ही पिके जमीनदोस्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास हिरावला जात आहे. कोरोनाच्या उपाययोजना करण्यात सर्व प्रशासन गुंतलेले असल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची शाश्वती नाही.