परभणी - कार्पोरेट धार्जिणे आणि 20 लाख कोटी मदतीचा खोटा दावा करणारे केंद्र सरकारचे कोविड-19 पॅकेज तत्काळ रद्द करून थेट आर्थिक मदतीचे नवीन पॅकेज जाहीर करा. तसेच कोविड-19 या रोगावर मात करण्यासाठी देशभर केरळ फाॅर्म्युला लागू करावा, अशी मागणी आज मंगळवारी परभणीत कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने करण्यात आली आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मार्फत निवेदन दिले आले. सरकारने पॅकेजमध्ये स्थलांतरित मजूर, शेतकरी, बेरोजगार, वृद्ध अपंग, छोटे व्यवसायिक यांना फारशी मदत न करता कर्ज वाटपाचा दिखावा केला आहे. कोरोनाचा गैरफायदा घेवून शासन कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द करणे, अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा बदलणे, सर्व कामगार कायदे मोडीत काढणे असे जनविरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने राज्य सरकारला जीएसटी करातील वाटा तसेच विशेष निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, मनरेगा बाबत फक्त घोषणाच होत आहेत. तरी ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे सुरू करावीत, सर्वांना रेशन पुरवठा या आणि अन्य काही मागण्याचे सविस्तर निवेदन देण्यात आले. यावेळी काॅम्रेड राजन क्षीरसागर, अॅड. माधुरी क्षीरसागर, शेख मुनीर, गंगाधर यादव, चंद्रभागा धुर्वे, राजेखाँ अकबरखाँ आदी उपस्थित होते.