परभणी - जिल्ह्यामध्ये बाजार समितीच्या मध्यस्थीने फेडरेशन मार्फत होणाऱ्या कापूस खरेदीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत असल्याचे समोर येत आहे. परिणामी गेल्या सहा दिवसांपासून परभणीच्या औद्योगिक वसाहतीच्या परिसरात शेकडो वाहने ताटकळत उभे आहेत. शेतकऱ्यांना एका जागेवर उभे राहूनसुद्धा वाहनांच्या भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. दुसरीकडे कापसाचा भाव घसरत असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. तर, संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी शासन तसेच प्रशासनाकडून याची दखल घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा - यवतमाळमधील हॉटेलमध्ये १० वर्षीय मुलीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद
परभणी शहरातील गंगाखेड रस्त्यावरील संत प्रयाग, दुर्गेश्वरी आणि महेश जिनिंग तर औद्योगिक वसाहत येथील गणेश जिनिंगमध्ये फेडरेशन मार्फत कापूस खरेदीची प्रक्रिया होत आहे. यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून बाजार समितीकडून प्रत्येक शेतकऱ्याला रांगेत उभे करुन टोकन दिल्या जात आहे. मात्र, या ठिकाणी मागच्या शनिवारपासून काही शेतकरी वाहनांसह रांगेत उभे आहेत. परभणीच्या औद्योगिक परिसरातील जवळपास दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्यावर साडेतीनशे ते चारशे वाहने उभी आहेत.
शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांना गेल्या सहा दिवसांपासून टोकन देणार म्हणून उभे केले आहे. परंतु, प्रत्यक्षात बाजार समितीचे कर्मचारी त्यांच्याकडे फिरकतसुद्धा नाहीत. दररोज 20 ते 25 लोकांना टोकन देवून व्यापाऱ्यांचे छुप्या मार्गाने वाहने जिनिंगवर पाठवले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला आहे. तसेच दिवसेंदिवस भाव पडत असल्याने ती वेगळीच चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. सहा दिवसांच्या पासून उभ्या राहणाऱ्या वाहनधारकांना गाडीच्या भाड्या सोबतच मुकामाचे दररोज हजार ते दीड हजार रुपये द्यावे लागते. हा हजारो रुपयांचा भुर्दंड वेगळा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करत आहेत.
हेही वाचा - तामिळनाडूमधील मंदिरात मिळाली हजार वर्षांपूर्वीची सोन्याची नाणी!