परभणी - शहरातील बऱ्याचशा भागात जवळपासच्या खेडेगावातून भाजीपाला उत्पादक शेतकरी आपला माल आणून विक्री करत आहेत. मात्र आता या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी उद्यापासून एका जागेवर न बसता आपला भाजीपाला फिरून विकावा, असे आदेश महापालिकेने काढले आहेत. परंतु भाजीपाला फिरुन विकण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात हातगाडे उपलब्ध होणार नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवीन अडचण निर्माण झाली आहे.
'कोरोना' च्या महाभयंकर संकटामुळे देशभर लॉक-डाऊन झाले आहे. संचारबंदीची परिस्थिती ओढावली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी एका जागी गोळा होऊ नये, यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या परिस्थितीत भाजीपाला, मेडिकल आणि किराण दुकाने उघडी ठेवण्याची मुभा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या तीनही ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. त्यातल्या त्यात रोज लागणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांसमोर अक्षरशः झुंबड उडत आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी कमी जागेत भाजीपाला विक्री करणारे व्यवसायिक बसलेले असतात. परभणीच्या वसमत रोडवरील काळीकमानजवळ रस्त्यावरच हे भाजीपाला विक्रेते बसून असतात. जागा अपुरी असल्याने सर्व भाजीपाला विक्रेते अगदी चिकटून आपला व्यवसाय करताना दिसतात. सध्या दुकानांसमोर आखणी करून ग्राहकांना उभे करण्यात येते. परंतु, ही उपाययोजना देखील काही काळापुरतीच राहत आहे. त्यानंतर नागरिक जवळ-जवळ येत आहेत. शिवाय विक्रेत्याच्या संपर्कातही नवीन-नवीन ग्राहक येत असल्याने त्याला संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशीच परिस्थिती परभणी शहरातील गांधी पार्क, क्रांती चौक, जुना मोंढा आणि कडबी मंडई या ठिकाणी देखील दिसून येते. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आता एका जागी भाजीपाला बसून विक्री करण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. या भाजी विक्रेत्यांनी गल्लोगल्ली तसेच कॉलनी आणि नगरांमध्ये फिरून आपला भाजीपाला विकावा, असे निर्देश महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी बजावले आहेत. परंतु, मुख्य अडचण अशी आहे की, एवढ्या मोठ्या प्रमाणात हातगाड्या उपलब्ध होतील का? यापूर्वी बागवान व्यावसायिक आपल्या हातगाड्यांवर भाजीपाला, फळ आदी विक्री करतात.
जवळपास तीनशेहून अधिक भाजी विक्रेत्यांना शहरात हातगाडी उपलब्ध करून दिल्यासच महापालिकेची ही उपायोजना यशस्वी होऊ शकेल, अन्यथा भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येईल. तसेच, लोकांनाही भाजीपाला उपलब्ध होणार नाही, त्यामुळे या अडचणीतून प्रशासनानेच काही मार्ग काढावा, अशी मागणी भाजीपाला उत्पादक तथा विक्रेत्या शेतकऱ्यांनामधून होत आहे.