परभणी - आत्तापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून न आलेल्या परभणी येथील जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या महिलेच्या स्वॅबचा नमुना काल (बुधवारी) तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अवाहल आज (गुरुवारी) दिवसभरात येण्याची शक्यता असून, त्यानंतर या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.
या महिलेला दमा असल्याची माहिती जिल्हाधिकारी डी.एम मुगळीकर यांनी दिली. तसेच त्या महिलेत कोरोनाची लक्षणे दिसून येत नव्हती. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने तिला जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. शिवाय दक्षता म्हणून तिच्या स्वॅबचा नमुना औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, ही महिला परभणी तालुक्यातील एका गावची रहिवाशी आहे. या महिलेला दम्याचा त्रास होत असल्याने मंगळवारी संध्याकाळी उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात आणले होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच बुधवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे सदर महिला कुठल्याही कोरोनाबधिताच्या संपर्कात आलेली नव्हती किंवा तिला परदेश तसेच मोठ्या शहरातील प्रवासाची पार्श्वभूमी देखील नसल्याचे समजते. मात्र, असे असले तरी या महिलेच्या अहवाल आज (गुरुवार) दिवसभरात प्राप्त होईल, त्यानंतर तिचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे स्पष्ट होणार आहे.