परभणी - साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून सध्या पाथरी आणि शिर्डीकरांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. साईबाबांचा पाथरी येथेच जन्म झाला आहे, त्याचे 29 पुरावे आमच्याकडे आहेत. शिर्डीच्या लोकांनी निर्माण केलेला वाद हा केवळ शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचण्याचा भीतीतून निर्माण केला आहे, असा आरोप परभणीतील साईभक्तांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साईबाबांचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथरी गावाला विकास कामासाठी 100 कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यानंतर शिर्डी येथील ट्रस्ट आणि पाथरी येथील साईसेवा मंडळामध्ये वाद सुरू झाला. यासाठी रविवारपासून शिर्डी येथील मंदिरात दर्शनही बंद ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा - ...म्हणे, 'मोहम्मद अली रस्त्यावर माझ्यासोबत होता हाजी मस्तान'
शिर्डीकरांनी पुकारलेला बंद हा भाविकांना वेठीस धरणार आहे. तो बंद त्यांनी मागे घेऊन साईबाबांनी दिलेली श्रद्धा आणि सबुरीची शिकवण अंमलात आणावी, असा परभणीच्या साईभक्तांनी शिर्डीकरांना दिला आहे.