परभणी - येथील महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात सर्वसामान्यांची वारंवार आंदोलने होत असतात. मात्र, आज एका माजी खासदारांनीच खड्ड्यांच्या समस्येमुळे महापालिकेच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते सुरेश जाधव यांना त्यांच्या कॉलनीतील खराब रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे पाऊल उचलावे लागले.
विशेष म्हणजे परभणी महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सत्ता आहे. अशा परिस्थितीत सुरेश जाधव यांनी आंदोलन करून काँग्रेसच्या महापौरांना घरचा आहेर दिला आहे. माजी खासदार सुरेश जाधव हे कृषी सारथी कॉलनीत राहतात. त्यांच्या कॉलनीसह आजू-बाजूच्या कॉलनींमध्ये रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यांच्याच घरासमोर गुडघ्यापर्यंत खड्डे पडल्याने या परिसरात ये-जा करणे मुश्कील झाले असल्याचे यावेळी जाधव यांनी सांगितले.
या संदर्भात महापालिकेच्या आयुक्तांना वेळोवेळी खड्डे बुजविण्याची विनंती केली. मात्र, या बाबींकडे आयुक्त आणि नगरसेवक लक्ष देत नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या माजी खासदारांनी महापालिकेत येऊन आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडला. त्याठिकाणी काही काळ बसल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या मुख्य दरवाज्यात येऊन ठाण मांडले. या प्रकारामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. अखेर काँग्रेसचे माजी मंत्री तसेच आमदार सुरेश वरपुडकर यांनी महापालिकेत येऊन सुरेश जाधव यांचा राग शांत केला. त्यांच्या कॉलनीतील रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश महापौर मीना वरपुडकर यांनी संबंधितांना दिल्यानंतर माजी खासदार जाधव यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.
सुरेश जाधव यांनी महापालिकेच्या कारभारावर कडक शब्दात ताशेरे ओढले. शहरातील सर्वच रस्ते अत्यंत खराब झाले असून त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. महापालिकेतील नगरसेवक कोणतेही कामे करत नाही. केवळ आश्वासनाची खैरात करत आहेत, असा आरोप जाधव यांनी केला. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही मित्र पक्षातील लोकप्रतिनिधींचे कुणी ऐकत नसतील तर या सत्तेचा काय उपयोग? असा सवाल देखील जाधव यांनी उपस्थित केला.