परभणी - एका वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी परभणीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. गंगाखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद यादव आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रणित खजे यांनी ही तक्रार केली असून गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
पालघर जिल्ह्यात दोन साधू आणि त्यांचे चालक अशा तीघांची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर या प्रकरणातील 110 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले. या विषयावर चर्चा करत असताना अर्णब गोस्वामी यांनी सोनिया गांधी यांच्याविरूद्ध अवमानकारक भाषा वापरली. तसेच जनभावना भडकतील, अशी वक्तव्ये करून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप गोविंद यादव यांनी केला आहे. तसेच गोस्वामी यांच्याविरोधात विवध कलमांनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. गंगाखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद यादव, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रणित खजे यांच्या या तक्रार अर्जावर स्वाक्षऱ्या आहेत. या संदर्भात कायदेशीर बाबींची तपासणी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती गंगाखेडचे पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख यांनी दिल्याची माहितीदेखील गोविंद यादव यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
पालघर येथे जमावाकडून तिघांची हत्या करण्यात आली होती. तिघांमध्ये दोन साधूंचा समावेश होता. या हत्याकांडावर रिपब्लिक हिंदी वृत्तवाहिनीवर २१ एप्रिलला रात्री ९ वाजता 'पूछता है भारत' या डिबेट शोमध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी पालघरमध्ये हिंदू साधूंची हत्या झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या गप्प का आहेत, इतर धर्मांच्या साधूंची हत्या झाली असती तर त्या गप्पा राहिल्या असत्या का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.