परभणी - गेल्या पंधरा दिवसांपासून वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे परभणी जिल्ह्यातील संचारबंदीची अंमलबजावणी अत्यंत कडक पद्धतीने होत होती. मात्र गेल्या चार दिवसात कोरोना बाधितांचा अकडा कमी होत असून, या पार्श्वभूमीवर आचारसंहितेत देखील शिथिलता देण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यानुसार शनिवारी रात्री 10.30 वाजता काढलेल्या आदेशात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसह इतर सर्व आस्थापनांना सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.
परभणी जिल्ह्यात सद्यपरिस्थितीत 89 कोरोनाबाधित आढळले आहेत. मात्र त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, तब्बल पन्नास लोकांना सुट्टी देण्यात आलेली आहे. ज्यामुळे केवळ 37 रुग्णांवर कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शिवाय दिलासाजनक बातमी म्हणजे गेल्या चार दिवसात नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच प्रलंबित राहिलेल्या अहवालांचे निकाल देखील निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे कुठेतरी कोरोनापासून परभणी जिल्ह्याला दिलासा मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यापूर्वी 31 मे रोजी जाहीर केलेल्या सकाळी 7 ते दुपारी 3 या बाजारपेठेच्या वेळेला वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारी रात्री 10.30 वाजता काढलेल्या लेखी आदेशात यापूर्वी देण्यात आलेल्या परवानगी प्रमाणे अत्यावश्यक तसेच अन्य सर्व प्रकारच्या दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 3 ऐवजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडण्याची परवानगी देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे परभणीकरांना खरेदीसाठी जास्तीचा अवधी मिळणार आहे. तसेच यामुळे अनेकांचे व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी नागरिकांनी बाजारात गर्दी न करता सोशल डिस्टन्सचे पालन करावे, तोंडाला मास्क बांधूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या वाढलेल्या वेळेमुळे बाजारातील गर्दी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे या निर्णयाचे व्यापारी वर्गातून स्वागत करण्यात आले आहे.