परभणी - जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या शेवडी गावात एका मतदान केंद्रावर पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून संघर्ष उडाला. यात काही ग्रामस्थ आणि एक पोलीस उपनिरीक्षकही जखमी झाले आहेत. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या व्हॅनच्या काचा फोडून टायरी फोडले आहे. यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे.
शेवडी येथील प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर १०० मीटर परिसरात वाहने उभी करू नयेत, यासाठी पोलिसांकडून सांगण्यात येत होते. याच बाबीवरून गावातील काही तरुणांशी पोलिसांचा वाद झाला. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. पोलिसांच्या जीपच्या काचा फोडून टायर देखील फोडले. यामुळे गावात तणाव निर्माण झाला. काही वेळासाठी मतदानाची प्रक्रिया ही बंद झाली होती.
दरम्यान जिल्हा पोलीस दलाने या गावात अधिकचा बंदोबस्त पाठवून दिला असून या केंद्रावर मतदान शांततेत सुरू आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी काहीही अडचणी नाहीत, पोलीस प्रशासन तैनात असून सज्ज आहे. आपण निर्भीडपणे मतदान करावे, असे अवाहन पोलिस दलाने केले आहे.