परभणी - शहरात गेल्या काही दिवसांपासून राशन दुकानांबाहेर प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. आज (शुक्रवारी) तर शहरातील इनायत नगर भागात एका रेशन दुकानाच्या समोरील दोन्ही रस्त्यांवर नागरिकांची प्रचंड रांग लागली होती. एकीकडे महिलांची तर दुसरीकडे पुरुषांची त्याहूनही मोठी रांग लागल्याचे चित्र होते. यामुळे या ठिकाणी 'सोशल डिस्टन्सिंग' चा अक्षरशः फज्जा उडाल्याचे दिसून आले.
'कोरोना' च्या वाढत्या संसर्गामुळे शासनाला लॉकडाऊन जाहीर करावे लागले आहे. मात्र, या परिस्थितीमुळे बहुतांश लोकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात शासनाने जाहीर केलेल्या राशनच्या योजनांमुळे गहू तांदूळ आणि इतर साहित्य मिळवण्यासाठी लोकांची आता शासकीय राशन दुकानवर प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, ही गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून फारसे नियोजन केल्या नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शहरात बहुतांश राशन दुकान समोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. आज (शुक्रवारी) परभणी शहरातील जुना पेडगाव रोड भागात असलेल्या इनायत येथेही अशाच प्रकारे लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या ठिकाणच्या राशन दुकानासमोर सकाळपासूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पुरुष आणि महिलांच्या स्वतंत्र सुमारे दोनशेहून अधिक मीटरच्या रांगा होत्या. विशेष म्हणजे या ठिकाणी कुठल्याही 'सोशल- डिस्टंस' अवलंब करण्यात आला नव्हता. केवळ दुकानाच्या समोरच 10 ते 15 लोक उभे राहू शकतील, असे बॅरिकेट्स लावण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात लाभार्थ्यांची संख्या हजाराच्या घरात असल्याचे दिसून येत होते.
हेही वाचा - मालेगावात पोलीस जीव धोक्यात घालून बजावतोय कर्तव्य, चांगल्या सुरक्षा साधनांचा अभावच..
मात्र, असे असले तरी प्रशासनाचे किंवा पोलिसांचे या ठिकाणी फारसे नियंत्रण नसल्याने नागरिक एकमेकांना खेटून गर्दी करताना आढळून आले. काही वेळानंतर आलेल्या पोलिसांनी ही गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही ही गर्दी आटोक्यात येत नव्हती. मुळात याठिकाणी 'सोशल डिस्टन्सिंग' च्या पार्श्वभूमीवर लोकांना उभे राहण्यासाठी कुठलीही मार्किंग करण्यात आलेली नव्हती, तर लांब पर्यंत बॅरिकेट्स लावून ही गर्दी नियंत्रणात आणण्याची गरज आहे. मात्र, तशा स्वरूपाच्या कुठल्याही उपाययोजना महसूल यंत्रणा अथवा पोलीस दलाकडून याठिकाणी झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ही गर्दी अनियंत्रित होऊन वाढत गेली.
प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने 'कोरोना' च्या संसर्गाचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल प्रशासनाने नियोजनबद्ध आखणी करून राशनचे वाटप करावे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.