परभणी- परभणीत शनिवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या छायाचित्राला चपलांचा हार घालून निषेध व्यक्त केला. दिल्ली विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेने केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
दिल्लीतील एका विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा आहे. मात्र या पुतळ्याची काही समाज कंटकांकडून विटंबना करण्यात आली. ही विटंबना काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटना एनएसयुआयने केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या घटनेबद्दल महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर परभणीत देखील भाजपने निषेध केला. येथील शिवाजी चौकात राहुल गांधींच्या छायाचित्राला पदाधिकाऱ्यांनी चपलांचा हार घातला. "राहुल गांधी यांचं करायचं काय...." अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनात भाजप शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, चंद्रकांत चौधरी, भाई कुलकर्णी, संजय रिझवानी, संजय कुलकर्णी, सुनील देशमुख, राहुल कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.