परभणी - येत्या दोन ते तीन महिन्यांत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार सत्तारुढ होईल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. जे कधी एकमेकाचं तोंड पाहात नव्हते, ते तीन पक्ष एकत्र आले आहेत, असे ते म्हणाले. मात्र, या पक्षांमध्ये कुठलाच पायपोस नसल्याने राज्यात भाजपा सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त आयोजित जाहीर सभेत दानवे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. अक्षदा मंगल कार्यालयात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार मेघना बोर्डीकर, तानाजी मुटकुळे, माजी आमदार मोहन फड, रामराव वडकुते, गजानन घुगे, जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, डॉ.सुभाष कदम, महिला जिल्हाध्यक्षा डॉ.विद्या चौधरी, बाबाराव बांगर, समीर दुधगावकर आदींची उपस्थिती होती.
'ही निवडणूक राजकारणाला दिशा देणारी'
पदवीधर निवडणुकीत शिरीष बोराळकर यांना विजयी करण्यासाठी पक्षाने जबाबदारी दिली आहे. ती पार पाडण्यासाठी वेळ द्यावा,असे आवाहन दानवेंनी केले. मतदानासाठी काहीच दिवस उरले असून नियोजनबद्धतेने कामाला गती द्यावी, असे ते म्हणाले. ही निवडणूक राजकारणाला दिशा देणारी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'विरोधकांकडून जातीपातीचे राजकारण - दरेकर'
याप्रसंगी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर देखील उपस्थित होते. पदवीधर निवडणुकीत विरोधकांकडून जातीपातीचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाचे सरकार असताना पाच वर्ष मराठवाड्यात जलदगतीने विकास झाला होता. गेल्या एका वर्षापासून विकासाचा बट्ट्याबोळ झाल्याची टीका त्यांनी केली. पदवीधर आमदार 12 पैकी 7 वर्ष सत्तेत होते. पदवीधरांसाठी त्यांनी काय केले, असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला. या आमदारांनी सभागृहात पोटतिडकीने प्रश्न मांडले नसल्याचे ते म्हणाले. शिरीष बोराळकर यांना निवडून देऊन 12 वर्षांचा पदवीधर मतदारसंघातील वनवास संपवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी योजनात्मक जबाबदारी पार पाडावी. राज्य सरकारच्या विरोधातील उद्रेक मतदानाच्या माध्यमातून दाखवून द्यायचा आहे, असे दरेकर म्हणाले.
मुंडे समर्थकाची बंडखोरी
पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश पोकळे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदासंघातून भाजपाविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. याचा भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. पोकळे हे मुंडे समर्थक आहेत. त्यामुळे भाजपा उमेदवाराचा पराभव करण्यासाठी पंकजा मुंडे यांचे अप्रत्यक्षरित्या पोकळेंना समर्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.