परभणी - बहिण-भावाच्या नावे असलेल्या शेत जमिनीचा फेर लावण्यासाठी खासगी मदतनीसामार्फत एक हजार रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आल्याची घटना घडला आहे. परभणीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालम तालुक्यातील बनवस येथे सापळा रचून ही कारवाई केली.
रमेश नरहरराव राजूरकर असे अटक कऱण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, बनवस येथील एका शेतकरी भावंडांना विकलेल्या जमिनीचा फेर लावून देण्यासाठी ही लाच मागितली होती. या संदर्भात शेतकऱ्याने स्थानिक लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. यानुसार सोमवारी(दि.16 सप्टेंबर)ला बनवस येथे सापळा रचण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी राजूरकर यांनी त्यांचा खासगी सहकारी दशरथ पांचाळ च्या हस्ते १ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे समोर आले. यानंतर रमेश राजूरकर आणि दशरथ पांचाळ या दोघांनाही लाचेच्या रक्कमेसह अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - अकोल्यात 500 रुपयांची लाच घेताना महिला तलाठ्याला अटक
यांसंबंधी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.