परभणी - दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शासनाने सर्व प्रकारची धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली करायला परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करताना भाजपच्या वतीने परभणीत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. मात्र सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यासाठी विलंब केला. आधी दारूची दुकाने उघडली, त्यानंतर मंदिरे सुरू करायला परवानगी दिली. असे म्हणत सरकारवर टीका देखील करण्यात आली.
तब्बल आठ महिन्यानंतर आज दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडण्यात आली आहेत. मंदिरे उघडल्यानंतर आज परभणीत भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली, भाजप मनपा सदस्य अशोक डहाळे व मंडळाध्यक्ष सुहास डहाळे यांनी श्रीराम मंदिरात महाआरती केली. महाआरती झाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
सरकारने दारूची दुकाने आधी उघडली
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी मंदिरे उघडल्या बद्दल सरकारसह मंदिरे उघडण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचे अभिनंदन केले. शासनाला उशिरा का होईना मात्र, हे शहाणपण सुचले आहे. एकीकडे ठाकरे सरकारने 'अनलॉक'ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वात आधी दारूची दुकाने, बार आणि हॉटेल्स उघडली. मात्र, त्यावेळी त्यांना मंदिरे उघडावी वाटली नाही. मंदिरांची कवाड उघडण्यासाठी त्यांनी खूप उशीर केला. अगदी शेवटच्या टप्प्यात मंदिरे सुरू झाली. उशिरा का होईना, परंतु ठाकरे सरकारला हे शहाणपण सुचले, यापुढे देखील देव त्यांना असेच शहाणपण देवो, असे म्हणत भरोसे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
कोरोनाच्या नियमांचे पालन करत शहरातील मंदिरे भाविकांसाठी खुली
दरम्यान, परभणीतील गांधी पार्क येथे असलेल्या श्रीराम मंदिरासोबतच अष्टभुजा देवी मंदिर, सुभाष रोडवरील बालाजी मंदिर, नांदखेडा रोडवरील पारदेश्वर महादेव मंदिर, बेलेश्वर महादेव मंदिर, कारेगाव रोडवरील व्यंकटेश बालाजी मंदिर, विद्या नगरातील सिद्धिविनायक गणपती मंदिर, गणपती चौकातील अष्टविनायक गणपती मंदिर यासह शहरातील अनेक लहान-मोठी मंदिरांची कवाडे आज भाविकांना दर्शनासाठी उघडी करण्यात आली आहेत. या वेळी सोशल-डिस्टन्सचे पालन करण्यासोबतच येणाऱ्या भाविकांना सॅनिटायझर देऊन मंदिरात प्रवेश दिल्या जात आहे.
हेही वाचा - मंदिरे उघडली...! भक्तांसह धार्मिक संघटनांमध्ये उत्साह; पण मंदिरावर उपजीविका असणाऱ्यांचा हिरमोड
हेही वाचा - उघडले देवाचे द्वार! पाडव्याच्या मुहूर्तावर उघडली राज्यातील प्रार्थनास्थळे...