परभणी - शहराच्या वैभवात भर टाकणारी बस स्थानकाची आधुनिक इमारत लवकरच परभणीत उभी राहणार आहे. येथे एअरपोर्टच्या धरतीवर बसपोर्ट होणार असून याचे भूमिपूजन आज (बुधवारी) परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे.
बसस्थानकाची इमारत जूनी झाल्याने एअरपोर्टच्या धर्तीवर नवीन बस पोर्ट (बसस्थानक) परभणीसाठी मंजूर करावे, अशी मागणी परभणीचे शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिवाकर रावते यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, जि.प. अध्यक्षा उज्वला राठोड, खासदार संजय जाधव, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अब्दुल्ला खान दुर्राणी, रामराव वडकुते, विप्लव बजोरिया, डॉ. राहुल पाटील, विजय भांबळे, डॉ. मधुसूदन केंद्रे, मोहन फड, महापौर मीना वरपुडकर, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापीक संचालक रणजितसिंह देओल, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, मनपा आयुक्त रमेश पवार यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील आणि विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांंनी केले आहे.
"असे असेल आधुनिक बसपोर्ट"
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नवीन बसस्थानक उभारणीसाठी १३ कोटी ४ लाख ४८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याचा प्रारूप आराखड्यात अद्यायावत १६ गाळे, २ अनलोडिंग प्लॉफॉर्म, इमारतीच्या दोन्ही बाजूस प्रसाधनगृह, भव्य उपहारगृह, ९ व्यापारी गाळे, स्वतंत्र पोलीस कक्ष, हिरकणी कक्ष, पार्सल कक्ष, स्वस्त औषधालय (जेनेरिक मेडिकल), नियंत्रण कक्ष, एटीएम, आरक्षण कक्ष, प्रतिक्षालय, महिला चालक-वाहक विश्रांतीगृह, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रवासी वाहन पार्कींग आणि सुरक्षा कक्ष, अशा स्वरुपात बांधण्यात येणार आहे. या शिवाय नूतन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पुरुष चालक-वाहन विश्रांतीगृह, बहुउ्देशीय सभागृह, ८ विश्रांतीगृह, व्यायामशाळा आणि पुरुष शयनगृह आदी अत्यधुनियक सोयी-सुविधा उभारण्यात येणार असून इमारत बांधणीसाठी दोन वर्षांची मुदत आहे.
"3 एकर जागेत उभे राहणार बसपोर्ट"
परभणी बसस्थानकाची एकूण जागा ३ एकर २० गुंठे असून १९६८ ला ही जागा परिवहन खात्यास वर्ग करण्यात आली. त्यानंतर १९७३ साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याहस्ते सद्याच्या बसस्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. तर बस आगारासाठी ४ एकर ३६ गुंठे आणि कर्मचारी निवासस्थानांसाठी १ एकर २४ गुंठे जमीन देण्यात आली आहे. बस आगार व कर्मचारी निवासस्थाने इमारतीचे बांधकाम १९८७ ला पूर्ण झाले. परंतू बसस्थानक इमारतीस ४६ वर्षे झाल्याने नवीन इमारत बांधणीची मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केली होती. त्या अनुषंगाने अंदाजे १३ कोटी रुपयांचा निधी सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.