परभणी - ज्या माणसांमुळे माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो, आज तीच माणसं संकटात असताना मी त्यांना मदत करणे माझे कर्तव्य समजतो, असे म्हणत दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या पाथरीतील एका फकिराने (भिकारी) पूरग्रस्तांना एक-एक रुपयाने जमविलेले दोन हजार रुपये दिले आहेत. एवढेच नव्हे तर त्याने इतरांनाही मदतीचे आवाहन केले आहे. त्याच्या या दानशूरतेची परभणी जिल्ह्यात चर्चा होत आहे.
पाथरीच्या विठ्ठल नगरातील शेख रोशन शेख उमर हे सायकल रिक्षातून पाथरी शहरात एक-एक रुपया भिक मागून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. मात्र, या अवलियाची दानत पाहून पूरग्रस्तांना मदत मागणारे इतर लोक अवाक झाले आहेत. या बद्दल पाथरीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेख रोशन यांच्या मनाच्या श्रीमंतीला सलाम करत पाथरीकरांनी त्यांचा सत्कार केला.
दरम्यान, सध्या सांगली, कोल्हापूर, कराड भागात कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे हाहाकार उडाला आहे. लाखो लोक बेघर झाल्याने या लोकांना मदत देण्यासाठी राज्यभरात मदत फेऱ्या काढल्या जात आहेत. त्याप्रमाणे मंगळवारी पाथरी शहरात देखील मदत फेरी काढण्यात आली. शहरातील श्री राम मंदिरापासून सुरू झालेल्या या मदत फेरीत प्रतिष्ठित मंडळी सहभागी झाली होती. या वेळी धान्यासह रोख रक्कम पुरग्रस्तांना मदत म्हणून देण्यासाठी अनेक हात पुढे येताना दिसत होते.
एका ठिकाणी कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी गवताचे गाठोडे विक्रीसाठी घेऊन बसलेली म्हातारी बाई पुढे सरसावली. तिनेही काही रुपयांची मदत पेटीत टाकली. त्याप्रमाणेच शहरातील लहान-लहान व्यावसायिक मदतीसाठी पुढे येताना दिसले. तर महिला धान्याच्या स्वरुपात मदत देत होत्या. पाथरी तालुक्याच्या ग्रामीण भागातही दुष्काळ असताना नागरीक पुढे येत असून गावांगावात धान्य आणि रोख रकमा जमा करत आहेत. ही सर्व मदत धान्याच्या रुपात थेट पूरग्रस्त भागात स्वयंसेवकांसह पोहोचवणार असल्याचे मदत फेरीच्या संयोजकांनी सांगितले.