परभणी - आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून धमकावलेची क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज परभणीमध्ये याविषयी स्पष्टीकरण दिले. 'एखाद्या अधिकाऱ्याबाबत तक्रार आल्यास कामचुकार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना मी बोलणारच, असा पवित्रा त्यांनी घेतला. जनतेने मला लोकप्रतिनिधीही म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे ज्याला जशी भाषा समजते, त्याला त्याच भाषेत बोलावे लागते, असे लोणीकर म्हणाले. तसेच वाद मिटला असून, तो विषय आता संपला, असे सांगत संबधित प्रकरणावर पडदा टाकायचा त्यांनी प्रयत्न केला.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आज परभणीत पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम आणि आनंद भरोसे उपस्थित होते. यावेळी जालना येथील एका आयपीएस अधिकाऱ्याला विधानसभेत उलट टांगण्याची भाषा केल्याप्रकरणी पत्रकारांनी लोणीकर यांना प्रश्न विचारले.
लोणीकरांचे स्पष्टीकरण -
एखादा अधिकारी बाहेरच्या राज्यातून येतो आणि या ठिकाणच्या प्रतिष्ठित व्यापाऱ्याला काही कारण नसताना नोटीस देतो. 50 पोलिसांसह त्याच्या घरात तो कसा काय जाऊ शकतो. यासाठी काही कायदे आहेत. कोणाच्या घराची झडती घ्यायची असेल तर न्यायालयाची परवानगी लागते. ज्या व्यक्तीच्या नावावर कुठलीही गुन्हे नाहीत, त्याचा कुठे जुगाराचा अड्डा नाही, तो गुटखा ही खात नाही, अशा व्यक्तीला त्रास देतात. अशा पद्धतीने चुकीची कारवाई पोलीस करत आहेत. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी व्यापार्याच्या घरी जाऊन त्यांची हात जोडून माफी मागितली आहे. त्या व्यापाऱ्याने देखील 'हा विषय आता संपला, असे सांगितले.
लोकप्रतिनिधी म्हणून आपली भाषा चुकली का ?
लोकप्रतिनिधी म्हणून आपली भाषा चुकली का ? या प्रश्नावर बोलताना बबनराव लोणीकर म्हणाले, मी लोकप्रतिनिधी आहे, जनतेने व व्यापार्याने माझ्याकडे तक्रारी केल्या तर त्या पाहाव्या लागतात. ही मराठी भाषा आहे, दादा कोंडकेची. जिकडे वळवली तिकडे जाते. सभागृहामध्ये एखाद्या अधिकार्याच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आला तर त्याला सुळाने बांधून नेण्याची प्रथा आहे. तिकडे जाऊन त्यांना गुडघे टेकून माफी मागावी लागते. त्यामुळे या अधिकाऱ्याने तिथे माफी मागण्याऐवजी कुटुंबाची माफी मागितली, अधिकारी नवीन आहे, त्याची पहिली पोस्टिंग आहे. त्यामुळे त्याच्याकडून चूक झाली. यापुढे त्याच्याकडून अशी चूक होऊ नये, ही काय रजाकारी आहे का ? असे देखील बबनराव लोणीकर म्हणाले.
'झारीतले शुक्राचार्य, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलणार..'
बबनराव लोणीकर यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलण्याच्या ऑडिओ क्लिप वारंवार प्रसिद्ध होत असतात. याबाबत विचारले असता, लोणीकर म्हणाले, क्लिप व्हायरल होणारच. झारीतले शुक्राचार्य आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात मी बोलणारच. आणि बोलावंही लागेल. लोकांनी मला निवडून कशासाठी दिले, ज्यांना जी भाषा समजते त्या भाषेत बोलावे लागेल, असा देखील तोरा बबनराव लोणीकर यांनी दाखवला.
'सरकारच्या अपयशाचा वाचला पाढा'
यावेळी बबनराव लोणीकर यांनी गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या काळात सुरू झालेल्या चांगल्या योजना कशा पद्धतीने बंद झाल्या याचा पाढा वाचला. जलयुक्त शिवार, मराठवाड्यातील वाटर ग्रीड योजना, रस्त्यांची कामे आदी बाबत त्यांनी प्रश्न निर्माण केले. तसेच भाजपच्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणात मराठवाड्याच्या रस्त्यांसाठी पैसा दिल्याचे ते म्हणाले. मात्र या सरकारने अनेक योजना गुंडाळून काय साध्य केले, असा सवाल देखील लोणीकर यांनी उपस्थित केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी धमकीवजा भाषा वापरू नये, असे देखील ते म्हणाले. एकूणच सरकारच्या वर्षभरातील कारकीर्दीला अपयशी असल्याचे सांगून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.