परभणी- कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे रोजच्या कमाईवर जगणाऱ्या गरीबांसमोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने अनेक हात त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यानुसार पाथरी शहरात आमदार बाबाजानी दुर्रांनी मंगळवारपासून 2 हजार 480 सर्वधर्मिय गरीब कुटूंबांची निवड करून त्यांना साधारण 15 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करत आहेत. या कार्यक्रमाला सामाजिक अंतर ठेवून पाथरीचे तहसीलदार यु.एन.कांगने, प्रभारी पोलीस निरीक्षक बोधगिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोजके पदाधिकारी उपस्थित होते.
पाथरी शहरात २१ तारखेपासून लॉकडाऊन सुरू आहे. गावागावात शेतीची कामे सुरू आहेत. मात्र, पाथरी शहरात जीवनावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाणे वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच कारणाने आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी काही सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांच्या मार्फत पाहणी करून शहरातील 2 हजार 480 कुटूंबांची निवड करून त्या कुटूंबांना टोकन वाटप केले.
प्रत्येक दिवशी 200 कुटूंबप्रमुखांना सकाळी 9 वाजता आमदार दुर्रानी यांच्या घराजवळ बोलावून हे अन्नधान्य त्यांना सुपूर्द केले जात आहे. या उपक्रमाला सुरुवात झाली असून अन्न धान्य वाटपावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक मिटर अंतरावर चुण्याने आखलेल्या 200 चौकोनात लाभार्थी बसविण्यात आले होते. प्रत्येक लाभार्थ्याने त्याच्या जवळील टोकन दिल्यानंतर त्याला जीवनावश्यक अन्नधान्याची बॅग देण्यात येत होती.
अन्नधान्याच्या बॅगमध्ये दहा किलो गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, दाळी, साखर, साबण, पत्ती अशा जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे. यावेळी बोलताना आमदार दुर्रानी म्हणाले की, अफवा पसरवू नयेत आणि लोकांनी देखील अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये. तर तहसीलदार कांगने यांनी या महिण्याचे संपुर्ण राशन हे दुकानदारांना दिले असून, पॉस मशीनव्दारे त्याचे वाटप सुरू आहे. तसेच उर्वरित लोकांना शासनाचे निर्देश मिळताक्षणी वाटप सुरू केले जाणार असल्याचे सांगितले.