परभणी - येथील बसस्थानकात पत्नीला तीन वेळेस 'तलाक, तलाक, तलाक' असे म्हणून एका इसमाने तिला फारकत देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित महिलेने परभणीतील कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार दाखल
परभणी शहरात राहणाऱ्या एका 42 वर्षीय महिलेने या प्रकरणी आज कोतवाली पोलिसात तक्रार दिली आहे. त्यामध्ये तिने तिच्या पतीने शिवीगाळ करत बस स्थानकात तलाक तलाक तलाक असे म्हणून तिला सोडून देण्याचा प्रयत्न केला आहे.
'न्यायालयात आहे प्रकरण चालू
सदर महिलेच्या पतीचे नाव होते फते मोहम्मद घोडू साहेब असे असून, तो लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रहिवासी आहे. त्या पती-पत्नी त्यापूर्वीच वाद झालेले असून, त्यांचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. मात्र, 'न्यायालयात सुरू असलेले प्रकरण मागे घे मी तुला नांदायला नेतो, असे म्हणत फते मोहम्मद याने पत्नीशी परभणीच्या बसस्थानकातच 7 जानेवारी रोजी वाद घातला होता. त्यानंतर हा प्रकार घडला.
असा घडला प्रकार...
सदर महिला तिच्या बहिणीसह परभणीच्या बस स्थानकात गेली असता, गुरुवारी दुपारी बस स्थानकात तिचा पती फते मोहम्मद हा तिला भेटला. त्याने तिला 'तू आता माझ्यासोबत अहमदपूरला चल, मी तुला नांदवतो, असे म्हटले. मात्र, 'आपले प्रकरण न्यायालयात असून, तू मला चांगले नांदवतो, असे लेखी दे, असे म्हणून पत्नीने फते मोहम्मद याला ठणकावले. मात्र त्याने 'लेखी देत नाही, तू न्यायालयातील केस मागे घे' असे म्हणत तिला त्याने शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय 'तू माझ्यासोबत येत नाहीस, तर मी तुला तलाक देतो, असे म्हणून तीन वेळेस तलाक म्हणून तिच्याशी फारकत घेण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार परभणी बस स्थानकात घडला असून, त्यानंतर या प्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलिसात फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक देशमुख करत आहेत.