परभणी - धानोरा मोत्या येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बाजूने निकाल देण्यासाठी पुर्णे येथील सहाय्यक निबंधक रविंद्र सावंतने पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती. गुरुवारी 25 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे.
तक्रारदार विविध कार्यकारी संस्थेचे संचालक
या प्रकरणातील तक्रारदार हे धानोरा मोत्या येथील रहिवासी असून ते शेती करतात. तसेच ते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा भाऊ पांडुरंग डाखोरे हे देखील एका कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष असून त्यांचे चुलत भाऊ संभाजी डाखोरे यांची जय हनुमान धान्य अधिकोष ही सहकारी संस्था आहे. या तिन्ही संस्थेची नोंदणी सहायक निबंधक कार्यालय पूर्णा झालेली येथे आहे. तक्ररदारांच्या भावांच्या दोन्ही संस्थेकडून चुकीच्या शेतकऱ्यांना शेती कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच संस्थेची वार्षिक सभा घेतली नाही, यामुळे संस्थेच्या विरोधात गावातील काही लोकांनी आक्षेप घेत सहकार खात्याकडे तक्रारी केल्या. या संस्थेच्या बाबतीत कलम ८३ नुसार चौकशी अहवाल सहायक निबंधक सावंतकडे सोपविण्यात आला. या संस्थेच्या विरूध्द असलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी आज (दि. 17 जून) सावंतकडे सुनावणी होती.
लाचेचा पाहिला हप्ता स्विकारताना कारवाई
या संस्थेच्या बाजूने सुनावणीचा निकाल देण्यासाठी सावंतने तक्रारदाराकडे मध्यस्थामार्फत 50 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत विभागाला माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराकडून सावंतने पाहिला हप्ता 25 हजार रूपये घेताना अधिकाऱ्यांनी त्याला तात्काळ अटक केली. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.