परभणी - देश नवीन राफेल विमानाची खरेदी करतो आहे. परंतु देशाचे संरक्षण मंत्री पॅरिसला जाऊन त्या विमानाच्या चाकांसमोर 2 लिंबू ठेवत आहेत. इकडे महाराष्ट्रातल्या शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना समान नागरी कायदा हवा आहे, हे कसे होणार?, असा सवाल करत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आज परभणीत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची टर उडवली. तसेच या कायद्याची उद्धव ठाकरेंना माहिती असेल, तर उद्या त्यांनी सामनातून छापून आणावी, असे आव्हान सुद्धा ओवेसी यांनी दिले.
परभणी शहरातील दर्गा रोड परिसरातील एका मैदानावर आज सायंकाळी झालेल्या सभेत असदुद्दीन ओवैसी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार इम्तियाज जलील, उमेदवार अली खान मोईन खान आदींसह पदाधिकारी आणि स्थानिक पुढारी उपस्थित होते.
हेही वाचा - परभणीच्या चारही विधानसभेत 'बंडोबा'चे आव्हान कायम; निवडणूक रिंगणात 53 उमेदवार
पुढे बोलताना ओवैसी म्हणाले, देश लढाऊ विमाने खरेदी करत आहे. मात्र, हे त्या विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवतात आणि यांना समान नागरी कायदा हवा आहे. मी नवीन गाडी घेतली तर मी कधीच लिंबू ठेवत नाही. उलट त्या लिंबूचे शरबत करून सर्वांना पाजतो, अशीही टीका ओवैसी यांनी यावेळी केली.
भाजप-सेनेवाले भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे म्हणतात. मग युवकांना नोकऱ्या का मिळत नाहीत? बँकेतून कर्जही भेटत नाही. नोटाबंदी नंतर व्यापाऱ्यांचा धंदा मंदावला आहे. देशात भीतीचे वातावरण तयार केले जात आहे आणि या सर्व गोष्टींवर सवाल उभा केल्यास हे 370 चा मुद्दा उपस्थित करतात, हिंदू-मुस्लिम म्हणतात, पाकिस्तानला धडा शिकवला म्हणतात ? हा खेळ हे खेळत आहेत. प्रत्येक आघाडीवर हे अपयशी ठरले आहेत, असा आरोप देखील ओवैसी यांनी केला.
या सभेला परभणी विधानसभा परिक्षेत्रातील युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - परभणीतील 4 मतदारसंघात 81 उमेदवार वैध; प्रस्थापितांसमोर बंडोबांचे आव्हान