परभणी - सुमारे 5 वर्षांपूर्वी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नाने पाकिस्तानातून भारतात परतलेल्या गीताला तीचे कुटुंबीय मिळाल्याचा दावा विश्व प्रसिद्ध ईधी वेलफेयर ट्रस्टचे माजी प्रमुख दिवंगत अब्दुल सत्तार ईधी यांच्या पत्नी बिलकिस ईधी यांनी केला. काही माध्यमांमधून गीता परिवारात जवळ पोहोचल्याचे वृत्त येत आहे. मात्र, असे नसून गीताच्या कुटुंबीयांचा शोध अजूनही 100 टक्के पूर्ण झालेला नाही. परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे त्यावेळी राहणाऱ्या मीना पांढरे यांनी 'गीता माझीच मुलगी आहे', असा दावा केला आहे. त्यांनी गीताच्या शरीरावर असलेल्या काही खुणा देखील सांगितल्या असून, त्या मिळत्याजुळत्या आहेत. परंतू, असे असले तरी डीएनए चाचणी नंतरच योग्य निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सरकारने लवकर डीएनए चाचणी घ्यावी, अशी मागणी गीताचा सांभाळ करणारे इंदोर येथील आनंद सेवा सोसायटीचे ग्यानेन्द्र पुरोहित यांनी केले आहे. डीएनए चाचणीनंतरच मीना पांढरे खरचं गीताच्या आई आहेत का, हे समोर येईल.
कोण आहेत मीना पांढरे -
गीता माझीच मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या मीना पांढरे या जिंतूरला राहत होत्या. त्यांचे पती सुधाकर वाघमारे यांचे निधन झाल्यावर त्यांनी दिनकर पांढरे यांच्याशी विवाह केला. त्यानंतर त्या औरंगाबादच्या वाळूज परिसरात राहण्यासाठी आल्या. गीता हरवल्यानंतर तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. माझ्या मुलीच्या शरीरावर जळलेली खूण आहे, तशीच खून गीताच्याही शरीरावर आहे. त्यामुळे ती माझी मुलगी आहे, असे मीना पांढरे यांनी सांगितलेले आहे, अशी माहिती गीताची जबाबदारी स्वीकारणाऱ्या इंदोर येथील आनंद सेवा सोसायटीचे ग्यानेन्द्र पुरोहित यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
गीता 4 वर्षाची असताना रडत मंदिरातून निघून गेली होती ?
जिंतूरच्या मीना पांढरे या महिलेने गीता आपलीच मुलगी असल्याचा दावा केला आहे. मीना यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार गीता तिच्या कुटुंबासोबत जिंतूर येथे राहत होती. त्या ठिकाणी मंदिराची पूजाअर्चा करण्याचे काम त्या करत होत्या. गीता जेव्हा 4 वर्षाची होती. तेव्हा तिला काही कारणास्तव रागावल्या होत्या. त्यावेळी ती रडत रडत मंदिरातून निघून गेली. मात्र ती परत आलीच नाही. त्यावेळी पोलिसांकडे जाण्याची भीती वाटत होती. त्याचबरोबर गीताचा फोटोही नसल्याने तक्रार देता आली नाही, अशी माहिती मीना पांढरे यांनी दिलेली आहे.
मीना पांढरे दोन मुलींसह मंदिरात करत होत्या सेवा -
मीना पांढरे आणि त्यांच्या दोन मुलींसह त्या जिंतूर येथील मंदिरात सेवा करत होत्या. गीताची मोठी बहीण मंदिराच्या बाहेर फुले विकण्याचे काम करायची. त्यावेळी गीता देखील त्यांच्यासोबत मंदिर परिसरातच असायची, असा अनुभव मीना पांढरे यांनी सांगितलेला आहे. गीताची मोठी बहीण वासंती वाघमारे विवाहानंतर गंगाखेडच्या चिंतामणी मंदिरात राहतात. त्यांचे पती मंदिराचे पुजारी आहेत. त्यांनी देखील गीता माझीच बहीण असल्याची माहिती दिली. शोधमोहीम करणाऱ्या पथकासोबत मीना आणि वासंती या गीताला भेटल्या होत्या. त्यावेळेस बराच वेळ त्यांनी गीतासोबत घालवला. गीतासोबत त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला होता. त्यावेळी गीताला भेटून, तिच्यासोबत बोलून वेगळाच आनंद झाला होता.
गीता तब्बल 15 वर्षे पाकिस्तानात राहिली -
सुमारे 20 वर्षांपूर्वी गीता चुकून रेल्वेत बसली होती आणि लाहोरला पोहोचली. मूकबधिर असलेली गीता तब्बल 15 वर्षे पाकिस्तानात राहिली. 2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकारातून गीता पुन्हा भारतात आली. त्यांनी इंदोरच्या आनंद आणि मोनिका पुरोहित यांच्या आनंद सेेवा सोसायटीवर तिचा सांभाळ करण्याची आणि खऱ्या परिवाराशी मिळवण्याची जबाबदारी टाकली. त्यानुसार पुरोहित यांनी संपूर्ण भारतात फिरून गीताने सांगितल्याप्रमाणे शोध घेतला. त्यात त्यांना मराठवाडा आणि तेलंगाणा सीमेवर काही संकेत मिळाले. त्यात जिंतूरमध्ये असलेली काही स्थळे गीताला परिचित वाटत असल्याने जिंतूर येथे शोध घेण्यात आला होता. त्यावेळेस मीना पांढरे यांना औरंगाबादला निरोप पाठवून बोलावून गीताची ओळख पटण्यास सांगितले होते.
परभणीच्या पहल फाउंडेशनकडे गीता घेत आहे शिक्षण -
सध्या गीता परभणीत वास्तव्याला असून, या ठिकाणच्या पहल फाउंडेशने तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. अनेक वर्षे गीता पाकिस्तानात राहिल्याने तिला भारतीय मूकबधिर भाषेतील शिक्षण मिळणे आवश्यक होते. त्या उद्देशाने इयत्ता पाचवीच्या पुढील शिक्षण तिला दिल्या जात आहे. पहल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिकेत शेलगावकर यांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली असून, परभणी शहरातील सिंचन नगरातील फाउंडेशन इमारतीत गीता शिक्षण घेत आहे.
डीएनए चाचणीनंतर होणार निर्णय -
मीना पांढरे आणि त्यांची मुलगी वासंती वाघमारे यांनी गीता आमच्या कुटुंबातील एक भाग असल्याचा दावा केला आहे. त्यानुसार आता गीताची ओळख पटवण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. कुटुंबीयांचे आणि गीताचे डीएनए तपासली केली जाणार असून, त्यानंतरच गीताला कुटुंबाला सोपवायचे का नाही, त्याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे शासनाने गीताच्या डीएनएची चाचणी घेऊन अहवाल लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी ग्यानेंन्द्र पुरोहित यांनी केली आहे.