परभणी - महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचार्यांकडून आज (मंगळवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 12 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले आहे. त्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेबाबत स्पष्टीकरण करुन मोहिमेत कोणता विभाग व कर्मचारी सहभागी होतील, याबाबत कळवले आहे. त्या मार्गदर्शक पुस्तिकेत पथकामध्ये अंगणवाडी कार्यकर्ता (आवश्यकतेनुसार महिला व बालकल्याण विभागची परवानगी घेऊन असा स्पष्ट उल्लेख केला आहे) या पथकाने दररोज 50 घरांना भेटी देऊन नागरिकांच्या तापमानाची तपासणी करायची आहे. तसेच, गरज पडल्यास इतर सुविधा देणे, घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रो-कोविड, कोविड व पोस्ट-कोविड यासंबंधी मार्गदर्शन करावयाचे आहे.
ही मोहिम 40 दिवस चालणार आहे. त्या संदर्भात राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांमध्ये कार्यरत असणार्या सर्व संघटनांच्या कृती समितीने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचे कळवले आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री तसेच मंत्री महिला व बालकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या राज्यमंत्र्यांना सविस्तर निवेदनदेखील पाठविण्यात आले आहे. या आंदोलनात अॅड. माधुरी राजन क्षीरसागर, कॉ. ज्योती कुलकर्णी, कॉ. सिमा देशमुख, कॉ. अर्चना कुलकर्णी, कॉ. सलमा शिरीन, कॉ. शाहेदा बेगम, शमा परान इटावा, कॉ. तहेरा बेगम आदी महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा - मराठवाडा-विदर्भाचा संपर्क तुटला; 'येलदरी'च्या सर्वच दरवाजांमधून विसर्ग, पूल पाण्याखाली