परभणी - एकीकडे पाणी, चाऱ्याअभावी शेतकऱ्यांना जनावरांचे पालनपोषण करणे दुरापास्त झाले आहे. त्यातच पालम तालुक्यातील अरखेड शिवारात कडब्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला वीज तारांचा स्पर्श झाला, आणि कडब्यासह टेम्पो जळून खाक झाल्याची घटना ९ मे रोजी सायंकाळी घडली.
परभणी जिल्ह्यात पाणी नसल्याने चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारात चाऱ्याला मागणी वाढली आहे. आरखेड शिवारात काही शेतकऱ्यांनी चाऱ्याचे उत्पादन घेतले असून या ठिकाणाहून चारा विक्री होत आहे. गुरुवारी हिप्परगा येथील काही शेतकरी आरखेड येथे आले होते. त्यांनी या ठिकाणी चारा विकत घेऊन तो टेम्पोमध्ये भरला. हा टेम्पो परतीच्या प्रवासाला जात असताना शिरपूर रस्त्यावर विजेच्या तारांचा स्पर्श होऊन आगीचा भडका उडाला. त्यात टेम्पोतील कडब्याने पेट घेतला.
कडबा पेटल्याची बाब काही वाहनधारकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी टेम्पोचालकाला माहिती दिली. टेम्पोचालकाने टेम्पो थांबवून खाली उडी घेतली. टेम्पोतील इतर शेतकऱ्यांनाही खाली उतरवले. बघता बघता आगीचे लोट वाढत गेले. जवळपास पाण्याची व्यवस्था नसल्याने आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे आग विझवणे शक्य झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर टेम्पो आणि त्यातील कडबा जळून खाक झाला. दरम्यान, टेम्पोचा जागेवरच कोळसा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर दुसरीकडे दुष्काळात जनावरांचा शेकडो पेंडी कडबा जाळून राख झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.