परभणी - जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या आठ गावातील मतदारांनी रस्त्याच्या प्रश्नावरून मतदान न करण्याची भूमिका घेतली आहे. गावकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून काळवून सुद्धा प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आठही गावांतील गावकऱ्यांनी मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला आहे.
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी आज(सोमवार) मतदान पार पडणार आहे. मतदान न करण्याच्या भूमिकेवर ठामच असल्याने या गावात मतदानाचा प्रश्न निर्माण होणार आहे. गोदाकाठच्या सात गावांना जोडणाऱ्या मार्गाचा प्रश्न गेल्या पन्नास वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रश्नावर कुठलीच उपाययोजना न झाल्याने २६ सप्टेंबर रोजी थडी उक्कडगाव येथे गोदाकाठच्या आठ गावांनी महापंचायतीचे आयोजन करुन मतदानावर बहिष्कार टकण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, राजकीय पदाधिकारी व अधिकारी कर्मचाऱ्यांना गावबंदी जाहीर केली होती. यानंतर प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार यांनी गावकऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्या व्यतिरिक्त कोणत्याही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेऊन साधी चौकशीही न केल्याने गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी परभणी जिल्हा प्रशासन सज्ज; ५६ मतदान केंद्र संवेदनशील
राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुध्दा या गावांना भेट देणे टाळले. या गावातील तरुणांनी प्रत्येक गावात सभा बैठका घेऊन रस्त्याच्या प्रश्नावर मतदान न करण्याचा ठाम निर्धार केला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी थडी उक्कडगाव येथे या आठ गावातील नागरीकांनी एक बैठक घेऊन रस्त्यासाठी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार कायम ठेऊन प्रशासनाशी असहकार करण्याचे ठरवले आहे. या बैठकीस लासीना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लोहीग्राम, खरपी तांडा येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.