परभणी - शहरातील विधवा महिलेच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस नाईक संतोष अंजिराम जाधव याला पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे. तर गंगाखेड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांची कर्तव्यात कसूर केल्यामुळे चौकशी सुरू होती, यात ते दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
मागच्याच आठवड्यात तीन पोलिसांवर कारवाई
काही आठवड्यांपूर्वीच रूजू झालेले पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी बेशिस्त भ्रष्ट आणि गुन्हे दाखल असलेल्या पोलिसांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या पूर्वीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दोषी आढळलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रस्तावित केलेल्या शिक्षेच्या कारवाया जयंत मीना पूर्ण करत आहेत. 29 ऑक्टोबर रोजी त्यांनी टिप्पर विकत घेऊन त्याचा अवैधरित्या वाळू वाहतुकीसाठी वापर केल्याचा आरोप असणाऱ्या सोनपेठ येथील पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ केले, तर पाथरी पोलीस ठाण्यात अवैद्य वाळूच्या वाहतुकीप्रकरणी वरिष्ठांशी वाद घालणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई केली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यानेच खून केल्याचे सिद्ध
नानलपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक संतोष जाधव याची जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलीसचौकी येथे नेमणूक केली होती. तेथे कार्यरत असताना परभणीतील हडको परिसरातील सरगम कॉलनीत राहणार्या रमा विठ्ठल सदावर्ते या विधवा महिलेशी त्याची ओळख झाली होती. पैशांच्या कारणावरुन 6 ऑक्टोबर रोजी फोन करून त्याने महिलेस बोलावून घेतले होते. त्यानंतर तिचा पाथरी रस्त्यावर निघृण खून केल्याच्या आरोपावरुन या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस चौकशीतून हा खून त्यानेच केल्याचे सिद्ध झाले असल्याने तसेच या कर्मचार्याच्या वर्तणुकीमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली असल्याचेही नमूद करत पोलीस अधीक्षक मीना यांनी ही बडतर्फीची कारवाई केली आहे.
गंगाखेडचे तीन पोलीस कर्मचारी निलंबित
पोलीस अधीक्षक मीना यांनी गंगाखेड ठाण्यात कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात बदली केली होती. कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्याविरुद्ध चौकशी करण्यात येत होती. त्यात ते दोषी आढळून आल्याने त्यांना आज (गुरुवारी) निलंबित करण्यात आले. सय्यद अमीन, मुक्तार खान पठाण व राजेश मस्के असे या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.