परभणी - जिल्ह्यात एकाच आठवड्यात दोन लाचखोरांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच गंगाखेडच्या एका लाचखोर पोलिसाला अटक करून त्याला खात्यातून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर सोमवारी वीज वितरण कंपनीच्या उपव्यवस्थापकाला दोन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. प्रकाश सुधाकर टाक असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
'कोरोना' महामारीच्या परिस्थितीमुळे अनेक जण माणुसकीच्या नात्यातून गरजूंना मदतीचा हात देत आहेत. तर दुसरीकडे लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी मात्र आपला स्वार्थ सोडताना दिसत नाहीत. परभणीच्या वीज महावितरण कंपनीच्या मानव संसाधन विभागातील उपव्यवस्थापक प्रकाश सुधाकर टाक यालाही दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या संदर्भात एका तक्रारकर्त्याने 12 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात एक तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे तक्रारदार हे वीज महावितरण कंपनीतून 28 वर्षाच्या सेवेनंतर उपकार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. तक्रारदाराचे सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या क्लेमकरिता संबंधीत कर्मचारी प्रकाश टाक हा लाच मागत आहे, अशी तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी लगेच सापळा रचला. त्यात पंचासमक्ष वीज कंपनीच्या मानव संसाधन विभागात (क्रमांक 2) तक्रारकर्त्यांकडून उपव्यवस्थापक प्रकाश सुधाकर टाक याला दोन हजार रूपयांची लाच स्विकारताना ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल कडू, अनिल कटारे, अनिरूध्द कुलकर्णी, सचिन धबडगे, जमिल जहागीरदार, मिलिंद हनुमंते, शेख शकील, शेख मुखीद, माणिक चट्टे, सारिका टेहरे, रमेश चौधरी, जनार्दन कदम यांच्या पथकाने केली. तर तक्रारदार हे वीज महावितरण कंपनीतून 28 वर्षाच्या सेवेनंतर उपकार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचेच काम वीज महामंडळात होत नसेल तर सर्वसामान्यांची कामे कसे होत असतील? हा यावरून प्रश्न पडला आहे.
दरम्यान, यापूर्वी 15 जूनला गंगाखेड येथील एका पोलिसाला एका आरोपीकडून प्रकरण मिटवण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी तडकाफडकी या कर्मचाऱ्याला बडतर्फ केले. या कारवाईमुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर आता वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आल्याने ही आठवड्यातील दुसरी घटना झाली आहे. तक्रारदार हे वीज महावितरण कंपनीतून 28 वर्षाच्या सेवेनंतर उपकार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचेच काम वीज महामंडळात होत नसेल तर सर्वसामान्यांची कामे कसे होत असतील? हा यावरून प्रश्न पडला आहे.