परभणी : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेतांमधील पीकं होत्याची नव्हती झाली आहेत. अशीच परिस्थिती परभणी तालुक्यातील पेडगाव येथे देखील झाली आहे. येथे एका तरुण शेतकऱ्याच्या पिकांची हिच अवस्था झाली. त्यामुळे यापुढे कुटुंबाचा गाडा कसा हाकावा? या विवंचनेतून या शेतकऱ्याने फाशी घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. माधव रघुनाथराव देशमुख (वय 36 वर्ष, रा. पेडगाव, ता. परभणी) असे या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पंधरवड्यात 2 वेळा अतिवृष्टी
माधव रघुनाथराव देशमुख सततच्या नापीकीला वैतागले होते. मात्र, यावर्षी पिक परिस्थिती उत्तम असताना मागील पंधरवड्यात 2 वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिके होत्याची नव्हती झाली. याच नैराश्यातून माधव देशमुख यांनी त्यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (19 सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली.
गतवर्षीच भाऊ-भावजयीचे अपघाती निधन
गतवर्षीच माधव देशमुख यांचे मोठे बंधू गोविंद देशमुख व त्यांच्या पत्नीचे अपघाती निधन झाले. त्यामुळे कुटुंबाचा संपूर्ण भार माधव यांच्या खांद्यावर आला होता. परंतु शेतातील नापिकी आणि अतिवृष्टीमुळे डोळ्यासमोर पिकांचे झालेले नुकसान त्यांना सहन झाले नाही. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
पश्चात वृद्ध आई-वडिल, पत्नी अन् दोन लहान मुलं
घटनास्थळी परभणी ग्रामीण पोलिसांचे पथक रवाना झाले असून, पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार असून, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, माधव देशमुख यांच्या पश्चात वृद्ध आई-वडिल, पत्नी आणि दोन लहान मुलं असा परिवार आहे. या परिवारासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अतिवृष्टीची नुकसान भरपाई तत्काळ देण्याची मागणी
दोन आठवड्यांपासून परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. वेळोवेळी पंचनामे देखील झाले; परंतु प्रत्यक्षात नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही. याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले, तर 'मी आत्महत्या करणार नाही', या अभियानाचे प्रमुख माणिक कदम यांनी देखील जिल्हा प्रशासनाने तत्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी करतानाच शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पालकमंत्री नवाब मलिक यांनी 16 व 17 सप्टेंबर रोजी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. लवकरच मदत देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजून शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.
हेही वाचा - पोलिसांच्या विनंतीनंतर सोमैया कराडमध्येच उतरले; राष्ट्रवादी-भाजप संघर्ष टळला