परभणी - गेल्या वर्षभरात परभणीच्या शहर वाहतूक शाखेने तब्बल 21 हजार बेशिस्त वाहनधारकांकडून 55 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये ट्रिपल सीट जाणारे वाहनधारक तसेच कागदपत्रे नसणारी वाहने, परवाना नसणारे चालक आणि तोंडाला मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2020 या वर्षात सुमारे चार महिने लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर वाहने धावली नव्हती. त्यामुळे वाहतूक शाखेच्या नियमित कारवाया झाल्या नाहीत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न बांधणाऱ्या व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्याची कारवाई वाहतूक शाखेकडून करण्यात आली होती.
हेल्मेट, कागदपत्रे नसणाऱ्या 20 हजार 771 जणांवर कारवाई
परभणी शहरात बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम नेहमीच राबवली जाते. या मोहीमेत विनाहेल्मेट, कागदपत्रे नसणे, वाहन चालवण्याचा परवाना नसणे, विना नंबर प्लेट यावरून 20 हजार 771 नागरिकांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून तब्बल 53 लाख 24 हजार 850 रुपयांचा दंड जमा झाला.
प्रत्येक महिन्यात अशी झाली कारवाई -
परभणी शहरातील बेशिस्त वाहनधारकांकडून जानेवारी 2020 मध्ये 2 हजार 245 गुन्हे दाखल झाले असून, त्यातून 5 लाख 36 हजार 400 रुपयांचा दंड वसूल झाला.
वर्षातील इतर महिन्यात किती दंड वसूल झाला याची माहिती -
महिना | केसेस | वसूल केलेला दंड |
---|---|---|
फेब्रुवारी | 1716 | 4 लाख 14 हजार 200 |
मार्च | 1436 | 4 लाख 42 हजार 600 |
एप्रिल | 26 | 8 हजार |
मे | 842 | 2 लाख 7 हजार 500 |
जून | 1490 | 3 लाख 67 हजार 700 |
जुलै | 5432 | 12 लाख 87 हजार 400 |
ऑगस्ट | 2523 | 6 लाख 89 हजार 400 |
सप्टेंबर | 917 | 3 लाख 69 हजार 400 |
ऑक्टोबर | 879 | 2 लाख 22 हजार 600 |
नोव्हेंबर | 1604 | 3 लाख 83 हजार 450 |
डिसेंबर | 1666 | 3 लाख 96 हजार 200 |
एकूण | 20 हजार 779 | 53 लाख 24 हजार 850 |
अवैध प्रवासी वाहतुकीतून 1 लाख 27 हजारांचा दंड वसूल
अवैध प्रवासी वाहतुकीवर देखील पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली. ज्यात जानेवारी 2020 मध्ये 44 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातून 43 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर फेब्रुवारीमध्ये 26 प्रकरणांच्या माध्यमातून 32 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला. मार्चमध्ये 21 जणांवर कारवाई करून 8 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या लॉकडाऊनच्या महिन्यात जिल्ह्यातील वाहतुक पूर्णतः ठप्प होती. त्यामुळे या 5 महिन्यात वाहतूक शाखेकडून कोणताही दंड वसूल करण्यात आला नाही. तर सप्टेंबर मध्ये केवळ 1 कारवाई करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये 11 जणांवरील कारवाईत 3 हजार 500 तर नोव्हेंबरमध्ये 64 जणांकडून 39 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर शेवटच्या डिसेंबर महिन्यामध्ये 109 अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात आली. वर्षभरात एकूण 276 जणांवर कारवाई करून पोलिसांनी 1 लाख 27 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला.
ई-चालानमुळे काम झाले सोपे-
विशेष म्हणजे यापूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड भरण्यासाठी वाहनचालकाला न्यायालयात अथवा वाहतूक शाखेत जावे लागत होते. मात्र, वाहनधारकांचा वेळ वाचवण्यासाठीआता ई-चालान प्रणाली कार्यान्वयित झाली आहे. ज्यामुळे वाहनचालकांकडून दंडाची रक्कम कॅश स्वरुपात तसेच महाट्रॅफीक अॅपच्या माध्यमातून वसूल करण्यात येते. ही दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पोलिसांचे काम सोपे आणि पारदर्शक झाले आहे.
'यांनी' केली कारवाई -
तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय व जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मोठे प्रयत्न केले.
हेही वाचा - 'अयोध्या जगाची सांस्कृतिक राजधानी होण्यासाठी मार्गक्रमण सुरू'