परभणी - सेलू तालुक्यातील कुंडी येथे 2 वर्षांपूर्वी केवळ 300 रुपये उसने घेण्याच्या प्रकरणातून एका युवकाचा खून झाला होता. याप्रकरणी परभणी जिल्हा न्यायालयाने ( Parbhani District Court ) 4 आरोपींना कलम 302,109 भादंवि अन्वये जन्मठेप व 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 2 वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. परभणीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी आज मंगळवारी या खटल्याचा निकाल दिला. ( Parbhani District Court Life-Imprisonment News )
उसन्या पैशांवरून झाला खून -
कुंडी येथे 18 मार्च 2020 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास उसने घेतलेल्या रकमेपैकी राहिलेले 300 रुपये परत न दिल्यावरुन राहुल देविदास डंबाळे याचा कोयता व चाकूचे वार करुन खून करण्यात आला होता. यानंतर मृताची आई प्रयागबाई डंबाळे यांनी या प्रकरणात सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन 4 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक वसुधंरा बोरगावकर यांनी केला.
शस्त्र, गाडी केली होती जप्त -
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले. आरोपीचे शस्त्र व आरोपीने गुन्हयात वापरलेली गाडी जप्त केली. शस्त्रावरील तसेच गाडीमधील रक्ताचे नमुने घेण्यात आले. तसेच मृताचे कपडे जप्त करण्यात आले. या गुन्ह्यातील मुद्देमाल सीए तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सीएच्या अहवालामध्ये मृताचा रक्तगट व आरोपीचे शस्त्रावरील व कपड्यावरील रक्तगट एकच आला. तपासात पोलीस नाईक विलास सातपुते व रामेश्वर मुंडे यांनी मदत केली. आरोपीविरुध्द सबळ पुरावा एकत्रित करुन तपासाअंती दोषारोप न्यायालयात दाखल केले होते.
हेही वाचा - Manisha Kayande on Darekars Arrest : प्रवीण दरेकरांना अटक व्हायलाच हवी- आमदार मनिषा कायंदे यांची मागणी
प्रत्यक्षदर्शीची साक्ष ठरली महत्त्वाची -
सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासले. सरकार पक्षाच्या वतीने प्रमुख सरकारी वकील अॅड. ज्ञानोबा दराडे यांनी बाजु मांडली. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार प्रयागबाई डंबाळे व संगिता डंबाळे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच शवविच्छेदन अहवाल शस्त्र जप्ती पंचनामा व सीए अहवाल यावरुन आरोपींविरुध्द परिस्थितीजन्य पुरावे सुध्दा उपलब्ध झाले. या प्रकरणात आज मंगळवारी (दि.15 मार्च) जिल्हा न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी आरोपी संतोष एकनाथ डंबाळे (वय-32 वर्षे), कपिल एकनाथ डंबाळे (वय - 29 वर्षे), प्रकाश एकनाथ डंबाळे (वय 34 वर्षे), मिलींद देविदास कांबळे (वय 35 वर्षे सर्व रा. पंचवटी नाशिक) यांना दोषी ठरवून आरोपींना कलम 302,10 9 भादंविअन्वये जन्मठेप व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 वर्षे साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात प्रमुख सरकारी वकील अॅड. ज्ञानोबा दराडे यांनी बाजू मांडली. तर पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी कपिल शेळके, सुरेश चव्हाण, वंंदना आदोडे, प्रमोद सुर्यवंशी यांनी काम पाहिले.