परभणी - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी आणि शुक्रवारी, असे 2 दिवस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने परभणी दौरा करणार आहे. राजकीय दृष्ट्या परभणी जिल्ह्यात कमजोर असलेले भाजपचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न या यात्रेतून केला जाणार आहे. तसेच या दौऱ्यात युतीत शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांमध्ये भाजप सभा घेऊन वातावरण निर्मिती करणार आहे.
हेही वाचा - फेल झालेल्या फडणवीस सरकारची पास होण्यासाठी 'जनादेश' यात्रा- नाना पटोले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परभणी जिल्ह्यात गुरुवारी जालना रोडवरील देवगाव फाटामार्गे आगमन होणार आहे. या ठिकाणी स्वागत झाल्यानंतर त्यांची दुपारी 1 वाजत सेलू येथील पाथरी रोडवरील बोर्डीकर मैदानावर जाहीर सभा होणार आहे. सेलू येथून सिमूरगव्हाण मार्गे ते पाथरीत दाखल होणार असून या ठिकाणी जिल्हा परिषद मैदानात दुपारी 3 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर, परभणीत शुक्रवारी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर ते वसमत रोडवरील असोला व झीरोफाटा येथे स्वागत घेऊन पुढे हिंगोली जिल्ह्याकडे प्रयाण करणार आहेत.
शिवसेनेच्या वाट्यातील विधानसभा मुख्यमंत्री गाजवणार -
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा प्रामुख्याने युतीत शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात होणार आहे. मागच्यावेळी स्वतंत्र लढल्याने पाथरीत भाजपचे सहयोगी तथा अपक्ष आमदार मोहन फड विजयी झाले आहेत. तर परभणीत शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील हे विद्यमान आमदार आहेत. जिंतूर सुद्धा शिवसेनेच्या वाट्याला असते. जिल्ह्यातील एकमेव गंगाखेड मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला येतो. मात्र, या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा दौरा होणार नाही.
हेही वाचा - केंद्राप्रमाणे आता राज्यातही विरोधी पक्षनेता राहणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसेनेच्या परभणी, पाथरी आणि जिंतूर-सेलू या तिन्ही मतदारसंघात हा दौरा केला जात आहे. त्यामुळे युती तुटल्यास या मतदारसंघात भाजपने पूर्वतयारी म्हणून हे नियोजन केले असावे, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. तसेच आजपर्यंत कुठल्याही स्वरूपात जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना सत्तेची फळे चाखता आलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्यात मरगळ आलेली आहे. परिणामी, त्यांच्यात ऊर्जा यावी, म्हणून मुख्यमंत्र्यांचा या यात्रेच्या निमित्ताने एक प्रयत्न असणार आहे. त्यात ते किती यशस्वी होतात, हे त्यांची यात्रा झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
हेही वाचा - येणाऱ्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही; मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेत ग्वाही
महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्याचे भाजप प्रभारी तथा पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी 3 दिवसांपूर्वी जिल्हा दौरा करून व्यवस्थेचा आढावा घेतला. यात्रेच्या तयारीसाठी पाथरीचे आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, यात्रा दिन प्रमुख शशीकांत देशपांडे, सहप्रमुख राजेश देशपांडे, माजी माजी आमदार विजय गव्हाणे, महिला नेत्या मेघना बोडीकर-साकोरे, माधव सानप, समीर दुधगावकर, संजय साडेगावकर, प्रमोद वाकोडकर व पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.