परभणी - जिल्ह्यातील पालम तालुक्यात झालेल्या २ अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला. तसेच एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. यातील पहिल्या अपघातात पोलीस पाटील असलेला तरुण विजेचा शॉक लागून मरण पावला. तर दुसऱ्या अपघातात दुचाकीस्वार बाप-लेक जीपला धडकले. यात बाप मरण पावला असून तरुण मुलगा गंभीर आहे. दरम्यान, त्याला नांदेडला उपचारकरता दाखल करण्यात आले आहे.
पोलीस पाटील वैजनाथ किशन गूट्टे (३२) असे विजेचा शॉक लागलेल्या तरुणाचे नाव आहे. ते सादगीरवाडी येथील पोलीस पाटील होते. रविवारी रात्री उशिरा राहत्या घरी विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच नवनाथ मुसळे, अतुल गुट्टे, राजाभाऊ केंद्रे आणि नातेवाईकांनी गुट्टे यांना राणीसावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
यानंतर पुढील उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मुंडे यांनी त्यांना मृत घोषीत केले. यावेळी जमादार सुरेश पाटील, प्रविण कांबळे यांनी रुग्णालयात पंचनामा केला. याप्रकरणी प्रा. वसंत पांडुरंग गुट्टे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत आज दुपारी ३ वाजता पालम ते लोहा राष्ट्रीय महामर्गावर दुचाकी व जीपचा समोरासमोर आपघात झाला. यातील दुचाकी पालमकडे येत होती तर जीप लोह्याकडे जात असताना आईनवाडी फाट्याजवळ त्यांचा अपघात झाला. यात दुचाकीस्वार गोपाळ पुंडलीक शिंदे (वय ५० रा. पुयणी) हे जागीच ठार झाले आहेत. तर त्यांचा मुलगा भागवत गोपाळ शिंदे (वय १८ वर्षे) हा गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती नाजूक झाल्याने त्याला तेथील लोकांनी तत्काळ पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.