पालघर /वसई - वसई पश्चिमेकडील माणिकपूर येथील भारत पेट्रोलियम पंपावर तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. पंपावर पेट्रोल भरण्यासाठी विनामास्क आलेल्या तरुणांनी पंपाची तोडफोड केली आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नालासोपारा येथे राहणारे 10 ते 12 तरुण दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले होते. या तरुणांनी मास्क न लावल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्या पेट्रोल देण्यास नकार दिला. या गोष्टीच्या रागातून तरुणांनी पंपावर तुफान राडा घातला. यावेळी कर्मचाऱ्यांना मारहाण करून पंपावरील सामानाची व फिलिंग मशीनची तोडफोड केली. हा सर्व प्रकार पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा येथील गावगुंडांचा हैदोस यापूर्वीही पाहायला मिळाला होता. तीन महिन्यांपूर्वी नालासोपाऱ्याच्या प्रगती नगर येथील गुंडप्रवृत्तीच्या तरुणांनी भरदिवसा तलवारी नाचवत एका तरुणाला मारहाण केली होती.