पालघर- कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. नागरिकांना जिल्ह्यात ये-जा करण्यास मनाई असताना देखील परवानगी न घेता ठाणे जिल्ह्यातून 29 कामगार पालघरमधील कोळगाव परिसरात आणल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- मुंबईत कोरोनाचे आज 417 नवे रुग्ण; 20 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्ण संख्या 6874 वर
कोळगाव येथे पालघर जिल्हा मुख्यालयाचे काम सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असून जिल्हा बंदी असताना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून मुख्यालयाच्या कामासाठी 29 कामगार विना परवानगी ठाण्याहून पालघर मधील कोळगाव परिसरात आणण्यात आले. डेकोर होम इंडिया प्रायव्हेट लिमटेड एजन्सीद्वारे हे कामगार पालघरमध्ये आणल्याचे समजते. कोरोनाग्रस्त रुग्ण असलेल्या ठाण्यातून हे कामगार आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
या संदर्भात पोलिसांना माहिती मिळताच या कामगारांना ठाण्याहून पालघरला घेऊन आलेली बस पोलिसांनी ताब्यात घेतली असून, ठेकेदाराविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कामगारांची वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले.