पालघर - 'उमेद' अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करून संस्थेचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुनर्नियुक्ती सह विविध मागण्यांसाठी उमेद अभियानाच्या हजारो महिला आज रस्त्यावर उतरल्या होत्या. महिलांच्या संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरू राहावे व बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये, या मागणीसाठी उमेद अंतर्गत काम करणाऱ्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढत आंदोलन केले.
या मोर्चामध्ये उमेद अभियानातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला तसेच सर्व कर्मचारी आणि पालघर-ठाणे उमेद अभियानातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 'उमेद' अभियान हे बाह्य संस्थेकडे देऊ नये, उमेदचे खासगीकरण थांबवून कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणालाही कमी करू नये तसेच बाह्य संस्थेकडे हे अभियान वर्ग न करता आहे त्याच पद्धतीने चालवावे, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
तसेच याबाबत सकारात्मक विचार करण्यात न आल्यास आजच्या मोर्चापेक्षा दुप्पट संख्येने महिलांना एकत्र आणून निषेध मोर्चा काढला जाईल, असा इशारा कंत्राटी कर्मचारी मंडळाच्या जिल्हाध्यक्ष निर्मला शेलार यांनी दिला.