पालघर - राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्यासाठी तंत्र-मंत्र हा अघोरी प्रकार करणाऱ्या दोघांना जव्हार पोलिसांनी अटक केली आहे. या प्रथेचा प्रयोग एकनाथ शिंदे यांना मारण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक माहिती दिली उघड केली जात नाही.
समाज प्रबोधनाचा प्रचार आणि प्रसाराची गरज-
यावर आज राज्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. जादूटोणा करने ही विकृती आजही समाजामध्ये आहे. राज्यात सक्षम कायदा असुनही असे प्रकार घडतात. समाज प्रबोधनाचा प्रचार आणि प्रसाराची गरज आहे. असे अघोरी प्रकार होऊ नयेत आणि असे कोणी कुठल्या जाणिवेतून करित असेल तर कारवाई करावी, असे दरेकर म्हणाले.
माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या निधनानंतर प्रविण दरेकर वाडा येथे त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
अनिष्ट व अघोरी प्रथांविरोधात गुन्हा दाखल, दोघांना अटक -
कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत व्हावी, यासाठी अनिष्ट अघोरी प्रथांचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. वापरकर्त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू , सफेद कोंबडा यांचा वापर करून जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा- मंत्री एकनाथ शिंदेंवर जादूटोणा! कोणी दिली शिंदेच्या हत्येची सुपारी?