पालघर - पाथर्डी हे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम जव्हार तालुक्यातील गाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेलोशिपअंतर्गत पाथर्डी हे गाव दत्तक घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्यानंतर गावातील किमान काही प्रश्न तरी मार्गी लागतील, अशी गावकऱ्यांची रास्त अपेक्षा होती. मात्र, दोन वर्ष झाले तरी गावाचा कायापालट तर झाला नाहीच. शिवाय गावातील पाण्याचे संकटही दूर झाले नाही.
पिण्याच्या पाण्यासाठी या पाथर्डी गावातील पाडे आज टाहो फोडत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासूनच येथील नागरिक पाणी टंचाईचा सामना करत आहेत. या गावातील विहिरी, नाले कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याने तळ गाठलेल्या विहिरीत मुलांना उतरून भांड्यात पाणी भरून द्यावे लागते. एक भांडे भरण्यासाठी येथील महिलांना तासनंतास वाट पहावी लागते. पाथर्डीमध्ये हे दृश्य रोज पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील मोखाडा आणि जव्हार हे दोन तालुके सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असून अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जव्हार तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायतीत सात पाडे असून या गावात पाणी टंचाईची भीषण समस्या उद्भवली आहे. गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. विहिरीत असलेले पाणी अतिशय निकृष्ट, गाळयुक्त तसेच गढूळ असून ग्रामस्थांना पिण्यासाठी याच पाण्याचा वापर करावा लागत आहे. या गढूळ पाण्यामुळे गावात रोगराईचे प्रमाण वाढले आहे. वृद्ध तसेच लहान मुलांचा आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाथर्डी येथील डोंगरपाडा येथे फक्त टँकरने पाणीपुरवठा केला जात असून तोही अनियमित आहे.
जिल्ह्यात नवनवीन नदीजोड प्रकल्प व बंधारे बांधून येथील पाणी शहरांकडे वळविण्यात येत आहे. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेल्या येथील स्थानिक लोकांचे काय? असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री पाणीटंचाई आणि दुष्काळाचे निवारण करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना करीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेलोशिपअंतर्गत दत्तक घेतलेल्या गावामध्ये भीषण पाणीटंचाई आहे. या तहानलेल्या गावाकडे लक्ष द्यायला प्रशासनाकडे वेळ नाही.