वाडा (पालघर) - तालुक्यातील कुडूस पोलीस ठाण्यांतर्गत लॉकडाऊन काळात एका दुकानात चोरी करण्यात आली होती. यातील तीन आरोपी पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 11 लाख 66 हजार 590 रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
वाडा तालुक्यातील कुडूस बाजारपठेमधील मोबाईल शॉपीमध्ये 19 मे रोजी चोरी करण्यात आली होती. यात 11 लाख 66 हजार 590 किंमतीचे मोबाईल फोन, 10 हजाराचे डीव्हीडीआर मशीन आणि 2 लाखाहून अधिक रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या गुन्ह्यातील तीन आरोपींना वाडा पोलिसांनी अटक केली असून यातील चोरण्यात आलेला मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना चोरीसाठी वापरण्यात आलेली गाडी भिवंडी येथे एका ठिकाणी सापडली होती. या गाडी मालकाचा शोध घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यातील तीन आरोपी हे 7 जून रोजी पकडण्यात आले. या आरोपींकडून 11 लाख 66 लाख 590 रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणाचा तपास पालघर स्थानिक गुन्हे शाखा व वाडा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे करण्यात आली. या प्रकरणी वाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.